मित्रांकडुन घेतलेले पैसे परत देण्यासाठी लुटमार झाल्याचा केला बनाव पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने युवकाचे फुटले बिंग

मित्रांकडुन घेतलेले पैसे परत देण्यासाठी लुटमार झाल्याचा केला बनाव
पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने युवकाचे फुटले बिंग

पाचोरा-
मित्रांकडुन हात उसणवारीवर घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी पाचोऱ्यातील युवकाने लुटमार झाल्याचा बनाव करत पोलिसात खोटी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा येथील एका कुरियर कंपनीत कुरिअर बाॅय म्हणुन कार्यरत असलेला धिरज विनोद पटवारी (वय – २०) रा. साई पार्क, पाचोरा हा दि. १ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता पाचोरा पोलिस स्टेशनला येवुन मी एका खाजगी कुरिअर कंपनीत कार्यरत असुन माझ्याकडील कंपनीचे १७ हजार रुपये होते. ते ३ ते ४ अज्ञात इसमांनी माझ्या डोळ्यात व अंगावर मिरची पावडर टाकुन लुटमार झाल्याची फिर्याद देत असतांनाच ठाणे अंमलदार मुकुंद परदेशी यांचे मनात धीरज विषयी संशयाची पाल चुकचुकली. मुकुंद परदेशी यांनी लागलीच धीरज यास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांचे समोर उभे केले असता धीरज याने लुटमार झाल्याचा पाढा सुरुच ठेवला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी धीरज याला चार प्रश्न विचारुन लुटमारीचा बनाव उघड केला. धिरज याची अंग झडती तसेच त्याचे जवळ असलेल्या बॅगेची झडती घेतली असता बॅगेत स्थानिक बनावटीची मिरची पावडरची रिकामी पुडी आढळून आली. मिरची पावडर स्थानिक बनावटीची असल्याने पोलिसांनी सदरहु मिरची पावडर पुडी बाबत चौकशी केली असता मिरची पावडर पुडी ही धीरज यानेच त्याचे घरा जवळील एका किराणा दुकानातुन घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर धिरज याचे वडिल विनोद गणेशमल पटवारी यांना पोलिस स्टेशनला बोलविले असता पोलिसांनी व विनोद पटवारी यांनी धिरजला विश्वासात घेऊन खरे ते सांग असे सांगितले असता धीरज याने चुक मान्य करत १७ हजार रुपये घरीच आहेत. मी माझ्या मित्रांकडुन १० हजार रुपये हात उसणवारीवर घेतलेले होते. ते पैसे मला ३० जुन पर्यंत परत करायचे असल्याने मीच हा खोटा लुटमारीचा बनाव केला. त्यानंतर पोलिसांनी धिरज याचे घरुन १७ हजार रुपये हस्तगत केले. व संबंधित कुरिअर कंपनीचे सुपरवायझर विजय विनायक पाटील यांना पोलिस स्टेशनला बोलावुन १७ हजार रुपये सुपुर्द केले. अवघ्या दोन तासातच पाचोरा पोलिसांच्या पथकाने बनावट लुटमारीचा पर्दाफाश केला आहे. शहरात यापुर्वीही अशा बनावट लुटमारीच्या व घरफोडी झाल्याच्या फिर्यादी दाखल झालेल्या असुन अशा बनावट लुटमारी व घरफोड्यांचाही पाचोरा पोलिस तपास करत आहेत.