‘भरारी’ ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’ शिलाई मशीन, शेळ्या व खतांचे वाटप

‘भरारी’ ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’
शिलाई मशीन, शेळ्या व खतांचे वाटप

जळगाव, दि. 1 – शेतकरी आत्महत्या व कोविडमुळे घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याने या कुटूंबांना विविध अडचणींना सामोर जावे लागत असल्याने त्यांना भक्कम आधाराची गरज असते. ‘भरारी’ फाऊंडेशनने अशा कुटूंबांना शिलाई मशीन, शेळ्या तसेच खतांचे वाटप करुन त्यांना ‘आधारा’ बरोबरच ‘उभारी’ देण्याचे काम केले आहे. त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज भरारी फाऊंडेशनच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि कोविडमुळे मृत्यु झाल्याने विधवा झालेल्या महिलांना शिलाई मशीन, शेळया, खतांचे वाटप जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांच्यासह लाभार्थी कुंटूंबिय उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त कुटूंबांला स्थैर्य मिळवून देण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, त्यांना आर्थिक मदत करणे, रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागात ‘उभारी’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस विभागातील विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत आहेत.
जळगाव येथे भरारी फाऊंडेशन ही संस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे याकरीता जिल्ह्यात शेतकरी संवेदना अभियान गेल्या काही वर्षापासून राबवित आहेत. या अभियानाच्या माध्यमातूनच त्यांनी आनंदा मंजा अहिरे, रा. विटनेर, ता. पारोळा हा शेतकरी मागील काही दिवसांपासून तणावपूर्ण जीवन जगत असल्याने त्यांचे समुपदेशन करुन त्यांना शेतीला जोडधंदा म्हणून आज कृषिदिनी 35 हजार रुपये किंमतीच्या सहा शेळ्या दिल्यात. त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील राहुल निकम हा शेतकरी आर्थिक अडचणीत असून शेतातील पिकांना खते व किटकनाशके घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याला खते, बी-बियाणे व किटकनाशके देण्यात आले. तर कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी निराधार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने कविता अनिल मराठे, शिरसोली व सुरेखा अनिल चव्हाण, जळगांव यांना शिलाई मशिनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
*114 गावातील 30 हजार शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण*
भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील 114 गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तीस हजार शेतकऱ्यांना भेटून सर्व्हे करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजु व अडचणींत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करणे, बी बियाणे उपलब्ध करून देणे, तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, मुलामुलींचे लग्न व शिक्षणासाठी मदत करणे आदि उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून करीत असून या अभियानासाठी सचिन महाजन, विनोद ढगे, जयदीप पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, सुदर्शन पाटील, रितेश लिमडा, दीपक विधाते व निलेश जैन हे परिश्रम घेत आहे. या उपक्रमासाठी त्यांना समाजातील विविध दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभत असल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले.
यावेळी के. के. कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी, स्पार्क ईरीगेशनचे रविंद्र लढ्ढा, मुकेश हसवाणी, अमर कुकरेजा, लक्ष्मी ॲग्रोच्या संचालिका संध्या सुर्यवंशी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भट, अनिल कांकरिया, पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, किशोर ढाके, उद्योजक सपन झूनझूनवाला, योगेश पाटील, निलेश झोपे आदि उपस्थित होते.