सोयगाव तालुक्यासाठी जळगाव येथून खत पुरवठ्यास मुख्यमंत्री यांची मान्यता; आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश
सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.23, तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खताची टंचाई भासू नये तसेच संतुलित खताचा वेळेत आणि सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी सिल्लोड–सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत सोयगाव तालुक्यासाठी जळगाव येथून खत पुरवठा करण्याची मागणी शासनाने मान्य केली असून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर येथून पुरवठा होत असे त्यामुळे दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला खत उपलब्धतेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे पेरणी आणि पीक व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन आमदार अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर तसेच कृषी आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या मागणीची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांनी राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक 2026 मध्ये ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
या बैठकीत मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत जळगाव येथून खत पुरवठा करण्यास तत्वतः मान्यता दर्शवली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यामुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.






















