पाचोरा तालुक्यावर शोककळा ; आमदार किशोर पाटील यांचे सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द

पाचोरा तालुक्यावर शोककळा ; आमदार किशोर अप्पा पाटील यांचे सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द

पाचोरा (वार्ताहर) दि १४
पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील भारतीय सैन्य दलातील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३५) यांना दि १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.४० वाजता पठाणकोट ( पंजाब) येथे वीर मरण प्राप्त होऊन हौतात्म्य आले आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे पाचोरा भडगाव मतदार संघाचे संवेदनशील आमदार किशोर अप्पा पाटील हे व्यथित झाले असून त्यांनी सोमवार दि १५ रोजी होणारे सर्व सत्कार समारंभाचे कार्यक्रम तसेच विविध ठिकाणच्या विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आदी कार्यक्रम रद्द केले असून संपूर्ण मतदार संघाच्या वतीने आपल्या सहवेदना या शहिद जवानाच्या कुटुंबियांसोबत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

पाचोरा तालुक्यातील सावखेडा गावातील सुमारे ७० तरुण देशसेवेसाठी देशाच्या विविध सीमांवर कार्यरत असल्याने ही पाचोरा तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे मात्र वयाच्या अवघ्या पस्तीस वर्षे वय असलेला मंगलसिंग परदेशी या आपल्या तरुण सैनिक बांधवाला येणारे वीरमरण हे अत्यंत दुःखदायक असून यामुळे आपण व्यथित झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.दरम्यान त्यामुळे पाचोरा, भडगाव,जळगाव आदी विविध ठिकाणी होणारे सर्व पूर्ण नियोजित कार्यक्रम आपण रद्द करत असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आमदार किशोर अप्पा पाटील हे नुकतेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बिनविरोध संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल ठीकठिकाणी त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. मात्र मतदारसंघात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आपण कोणतेही सत्कार स्वीकारणार नसल्याने कृपया कोणत्याही हितचिंतक,कार्यकर्त्यानी सत्कारासाठी येऊ नये असे म्हटले असून आपण शहीद जवानाचे वीरमरण झाल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशी भावना व्यक्त केली आहे.