सीमेवर प्राणांची पर्वा न करता उभा राहणारा जवान – २४ वर्षांची देशसेवा पूर्ण करून गणेश बोडखे शेंदुर्णीत परतले
दत्तात्रय काटोले
सोयगाव (ता. सोयगाव) – देशातील प्रत्येक नागरिक शांत झोप घेत असताना, बर्फाच्छादित पर्वतांवर, रणरणत्या वाळवंटात आणि धोकादायक सीमारेषेवर प्राणांची बाजी लावून उभा असणारा जवान म्हणजे देशाचा खरा आधारस्तंभ होय. अशाच निःस्वार्थ भावनेतून भारतीय सेनादलात २४ वर्षे अखंड सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले शेंदुर्णी येथील जवान गणेश रामदास बोडखे यांचे गावात आगमन होताच संपूर्ण परिसर भावूक झाला.
सेवाकाळात जवान बोडखे यांनी अनेक वेळा कडाक्याची थंडी, प्रखर उन्हाळा, सततचा धोका आणि मृत्यूची छाया अनुभवली. सीमारेषेवर उभा असलेला जवान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असतो. सण, उत्सव, कुटुंबातील सुख-दुःख यापासून दूर राहून केवळ “देश प्रथम” या भावनेने त्यांनी आपले आयुष्य देशाला अर्पण केले.
जवान बोडखे यांच्या या अतुलनीय देशसेवेच्या सन्मानार्थ शेंदुर्णी गावात वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानिक मूल्यांचा आदर व्यक्त करण्यात आला. पुढे हनुमानाची पूजा करून वाडी दरवाजापासून जवान गणेश बोडखे यांच्या निवासस्थानी मिरवणूक नेण्यात आली.
मिरवणुकीनंतर त्यांच्या निवासस्थानी भावनिक सत्कार समारंभ पार पडला. यावेळी शेंदुर्णी नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी जवान गणेश बोडखे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
भाषणात वक्त्यांनी सांगितले की,
“सीमेवर उभा असलेला जवान म्हणजे जिवंत ढाल असते. गोळी चालली तर ती आधी जवानावर चालते, नागरिकांवर नाही. अशा जवानांच्या त्यागामुळेच आज देश सुरक्षित आहे.”
यावेळी जवान गणेश बोडखे यांच्या आई-वडिलांच्या संस्कारांचे आणि त्यागाचे विशेष कौतुक करण्यात आले.
२४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गावात परतलेल्या जवान गणेश बोडखे यांचा हा सत्कार पाहून अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले. या प्रसंगी नातेवाईक, ग्रामस्थ, युवक, मित्रमंडळ, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या जवानाचा हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून, भारतीय सेनादलाच्या शौर्याला व त्यागाला दिलेला मानवंदना असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत होती. हा सोहळा युवकांसाठी देशसेवेची प्रेरणा देणारा ठरला.

















