देशातील २७ लाख वीज कर्मचारी १२ फेब्रुवारीला संपावर
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे मुंबईतून निवेदन
मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ – केंद्र सरकारच्या प्रस्तावित विद्युत (सुधारणा) विधेयक २०२५ व वीज क्षेत्रातील खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात देशातील सुमारे २७ लाख वीज कर्मचारी व अभियंते दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याची घोषणा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजने केली आहे.
या संपाला देशातील प्रमुख १० ट्रेड युनियन, स्वतंत्र फेडरेशन्स, संयुक्त किसान मोर्चा, विविध राजकीय पक्ष तसेच वीज उद्योगातील सात प्रमुख संघटनांचा समूह – नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स – यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, केंद्र सरकारकडून प्रस्तावित विद्युत कायदा २०२५च्या माध्यमातून देशातील ४४ सार्वजनिक वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. नफ्यातील वीज वितरण क्षेत्रात खाजगी भांडवलदारांना समांतर फ्रेंचायझी परवाने देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक कंपन्यांचे खाजगीकरण झाल्यास विजेचे दर वाढतील, शेतकऱ्यांना मिळणारी सबसिडी बंद होईल आणि स्मार्ट प्रीपेड मीटरच्या भांडवली खर्चामुळे कंपन्या आर्थिक संकटात सापडतील, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढल्याचाही मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व इतर तीन सहकारी संघटनाही या संपात सहभागी होणार आहेत. तथापि, संपामुळे वीज ग्राहकांची सेवा बाधित होऊ नये, असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा व सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.
प्रमुख मागण्या
वीज क्षेत्राचे खाजगीकरण तात्काळ थांबवावे
वीज (सुधारणा) विधेयक २०२५ मागे घ्यावे
राष्ट्रीय वीज धोरण २०२६ रद्द करावे
पूर्वांचल व दक्षिणांचल डिस्कॉम्सचे खाजगीकरण रद्द करावे
जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित करावी
आउटसोर्सिंग बंद करून नियमित नोकऱ्या सुनिश्चित कराव्यात
कंत्राटी कामगारांना नियमित करून रिक्त पदे भरावीत
वीज ही सार्वजनिक सेवा असून तिचे व्यापारीकरण थांबवावे
“वीज ही सार्वजनिक सेवा आहे, व्यवसाय नाही. सार्वजनिक वीज वाचवा – राष्ट्र वाचवा,” असा संदेश देत हा संप ऐतिहासिक करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
आपले विश्वासू
कॉ. मोहन शर्मा – अध्यक्ष
कॉ. महेश जोतराव – कार्याध्यक्ष
कॉ. कृष्णा भोयर – सरचिटणीस.
























