चोपडा महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान प्रसंगी युवतीना कृषी व बँकिंग क्षेत्रातील संधींचे मार्गदर्शन

चोपडा महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान प्रसंगी युवतीना कृषी व बँकिंग क्षेत्रातील संधींचे मार्गदर्शन

 

 

 

चोपडा,: महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आत्मनिर्भर युवती अभियान दिनांक २ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषी व बँकिंग क्षेत्राबाबत मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन सोनवणे, व्याख्याते उपकृषी अधिकारी जितेंद्र सनेर, बँक ऑफ महाराष्ट्राचे मनेजर अमित झा, प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ.आर एम बागुल, समन्वयक डॉ. एस.ए.वाघ, युवतीसभा प्रमुख डॉ. सौ. प्रीती रावतोळे, व डॉ. क्रांती क्षीरसागर हे मंचावर उपस्थित होते.

यावेळी कृषी विभागाची माहिती देण्यासाठी उपकृषी अधिकारी जितेंद्र सनेर यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी नमूद केले की महाडीबीटी पोर्टल हे शेतकरी व भूमीहीन शेतकरी यांच्यासाठी अतिशय उपयुक्त व्यासपीठ आहे. यावर शेतकरी व भूमीहीन शेतकरी दोघेही या पोर्टलवर नोंदणी करून योजनेसाठी अर्ज करू शकतात, बी-बियाणे, खते, औजारे, यंत्रसामग्री, सिंचन, फलोत्पादन, पशुसंवर्धन अशा विविध योजनांचा लाभ घेवू शकतात. आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय व कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या ची माहिती दिली. त्याचबरोबर महिला शेतकरी सक्षम झाल्या तर शेती अधिक सक्षम होते, हे शासनाचे धोरण असल्याने महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाते, विविध कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांना प्राधान्य दिले जाते. सिंचन सुविधांसाठी महिलांना व सर्वसाधारणपणे 80% पर्यंत सबसिडी उपलब्ध आहे, यात महिला बचत गट, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या यांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. 2026 हे वर्ष ‘महिला किसान वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे आणि त्या अंतर्गत महिलांसाठी विशेष कृषी योजना, प्रशिक्षण शिबिरे व कार्यशाळा, महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, महिला शेतकरी उद्योजकतेला चालना दिली जात आहे. अश्या पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बँकिंग क्षेत्राची माहिती देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर अमित झा यांचे बँकेतील व्यवहाराची माहिती व महिलांसाठी बँकेच्या विविध योजनांची माहिती या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी बँकिंग व्यवहारांची मूलतत्त्वे, बचत खाते, कर्ज योजना, महिला उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष योजना, आर्थिक नियोजन व आर्थिक शिस्त यांचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन.सोनवणे यांनी नमूद केले की, आजच्या स्पर्धात्मक युगात कृषी व बँकिंग सारख्या मूलभूत क्षेत्रांची माहिती विद्यार्थिनींना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग व शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध असून त्याचा लाभ विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आर्थिक साक्षरता ही आत्मनिर्भरतेची पहिली पायरी असून बँकिंग व्यवहारांची योग्य माहिती असल्यास महिलांना स्वतःचे भविष्य अधिक सक्षमपणे घडविता येते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. प्रीती रावतोळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. पूजा पुन्नासे यांनी केले. याप्रसंगी बँक सहायक श्री. राकेश सुधाकर चौधरी, मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.सौ रजनी जैस्वाल, सौ. हर्षा देवरे, सौ. पूजा पुन्नासे, . दर्शन पाटील, . धनंजय चौधरी, . निलेश भाट, . विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान रजिस्ट्रार डी. एम. पाटील, डॉ.एम.एल.भुसारे. डॉ. सी.आर. देवरे, डॉ. अभिजित साळुंखे, चेतन बाविस्कर, जी. एम. राठोड, यांचे सहकार्य लाभले.