लोकशाही दृढ करण्याचे मोठे काम प्रसिध्दी माध्यमाकडून केले जात कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले प्रतिपादन

लोकशाही दृढ करण्याचे मोठे काम प्रसिध्दी माध्यमाकडून केले जात कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले प्रतिपादन

 

जळगाव दि. ९ (प्रतिनिधी) लोकशाही दृढ करण्याचे मोठे काम प्रसिध्दी माध्यमाकडून केले जात असून जग झपाट्याने बदलत असतांनाही मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आपले अस्तित्व कायम ठेवले असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जळगांव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आठ पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी मंचावर उच्च शिक्षण विभागाच्या जळगावचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे, माध्यम शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सुधीर भटकर, पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा उपस्थित होते.

प्रा. माहेश्वरी म्हणाले की, विद्यापीठाला प्रसिध्दी माध्यमांनी कायम साथ दिल्यामुळे विद्यापीठाचे उपक्रम, उद्दिष्ट्ये पोहचविता आलीत, प्रसिध्दी माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तंत्रज्ञानामध्ये मोठे बदल होवून देखील मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे महत्व आणि विश्वासहर्ता टिकून आहे. सहसंचालक डॉ. संजय ठाकरे म्हणाले की, समाजाचे चित्र हे प्रसिध्दी माध्यमातून घडत असते. पत्रकार हा समाजाचा मोठा जबाबदार घटक आहे. उच्च शिक्षणातील विविध बदलांबाबत माध्यमांनी प्रसिध्दी देण्यासाठी जागा राखून ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा. सुधीर भटकर म्हणाले की, समाजातील चांगल्या वाईट घटना पत्रकार समाजासमोर आणत असल्यामुळे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. प्रवीण सपकाळे यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली.

या समारंभात प्रिंट मीडिया : विलास बारी (लोकमत), प्रदीप राजपूत(दिव्यमराठी), देविदास वाणी(सकाळ), राजेंद्र पाटील(पुण्यनगरी), इलेक्ट्रॉनिक मीडिया : चंद्रशेखर नेवे(एबीपी माझा), सचिन गोसावी(दूरदर्शन), डिजिटल मीडिया : संतोष सोनवणे (मॅक्स मराठी), छायाचित्रकार: आबा मकासरे (छायाचित्रकार) यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींच्या वतीने विलास बारी व चंद्रशेखर नेवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवीण ब्राम्हणे, भरत काळे, कमलाकर वाणी या पत्रकारांचा तसेच जैन उद्योग समुहाच्या माध्यम विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. गोपी सोरडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ॲङ सुर्यंकांत देशमुख यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम स्थळी झालेल्या रक्तदान शिबिरात १० जणांनी रक्तदान केले. रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने झालेल्या या रक्तदान शिबीरासाठी रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, ऍड.दिपक पाटील व दानिश खान यांनी, तर कार्यक्रम यशस्वितेसाठी माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्रा.रोहित देशमुख, रंजना चौधरी,प्रल्हाद लोहार,विक्रांत केदार,भिकन बनसोडे, शैलेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.