Home पाचोरा R.D. FOUNDATION संचलित स्वराज्य करिअर अकॅडमी तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात...

R.D. FOUNDATION संचलित स्वराज्य करिअर अकॅडमी तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

R.D. FOUNDATION संचलित स्वराज्य करिअर अकॅडमी तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

 

पाचोरा, दि. ३० मे : R.D. FOUNDATION संचलित स्वराज्य करिअर अकॅडमी, पाचोरा यांच्या वतीने यावर्षी पोलीस दलात निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. गणगे साहेब, ए.एस.आय. मोरे साहेब तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. चिंचोले सर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पी.एस.आय. गणगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना पोलिस दलातील कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि सेवाभाव याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. पोलीस सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनसेवा यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
तसेच प्रा. चिंचोले सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, योग्य नियोजन, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर यश कसे मिळवता येते याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान यावर्षी पोलीस दलात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये मा. देवेन संजय पाटील, मा. राजश्री दिगंबर पाटील आणि मा. पूजा बापू पाटील यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून माजी सैनिक वीरेंद्र दिनकर पाटील यांची एस.आर.पी.एफ. मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी स्वराज्य करिअर अकॅडमीचे प्रमुख प्रा. स्वप्नील मराठे सर यांनी सांगितले की, “स्वराज्य करिअर अकॅडमीचा यशाचा आलेख दरवर्षी अधिक उंचावत राहील. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांना यशस्वी करण्यासाठी संस्था कायम प्रयत्नशील राहील.”
कार्यक्रमाच्या शेवटी मैदानी प्रशिक्षक मा. शुभम गायकवाड सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Don`t copy text!