Home पाचोरा पाचोऱ्यात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला पाचोरा नगरपरिषदेचा वेग

पाचोऱ्यात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला पाचोरा नगरपरिषदेचा वेग

पाचोऱ्यात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला पाचोरा नगरपरिषदेचा वेग

शहरातील प्रमुख नाले, गटारींची युद्धपातळीवर स्वच्छता; पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही यासाठी प्रशासन सज्ज

 

 

 

पाचोरा:- पाचोरा नगरपरिषदेमध्ये दिनांक 25/05/2026 रोजी मा.नगराध्यक्ष सौ.सुनिता किशोर पाटील यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई व स्वच्छता मोहिमेला वेग देण्याकरीता नगरपरिषदेत विविध विभागांची आढावा बैठक घेऊन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी तुंबणे, दुर्गंधी, डासांची वाढ तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरातील प्रमुख नाले, गटारी, पाण्याचा निचरा होणारे मार्ग व सार्वजनिक परिसरांची मोठ्या प्रमाणावर साफसफाई सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले.

त्यानूसार मा.नगराध्यक्षा सौ.सुनिता किशोर पाटील यांच्या आदेशानूसार व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाईची कामे सुरू करण्यात आलेली असून अनेक ठिकाणी जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गाळ, प्लास्टिक कचरा, झाडाझुडपे व इतर अडथळे हटविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मागील पावसाळयातील अनुभव पाहता अनेक घरात पाणी शिरल्याने हानी झालेली होती त्या पार्श्वभुमीवर साचलेला गाळ काढून नाल्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

विशेषतः शहरातील पावसाळ्यात पाणी साचणारे संवेदनशील भाग, मुख्य रस्त्यालगतचे नाले, बाजारपेठ परिसर, निवासी वस्ती तसेच शाळा व सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातील गटारींची प्राधान्याने स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच नालेसफाईदरम्यान बाहेर काढण्यात आलेला कचरा तात्काळ उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

नगरपरिषद आरोग्य विभागातील अधिकारी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत असून स्वच्छता मोहिमेदरम्यान नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी व निर्जंतुकीकरणाची कामेदेखील हाती घेण्यात येत आहे.

नगराध्यक्षा सौ.सुनिता किशोर पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरगुती व प्लास्टिक कचरा नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. नाल्यांमध्ये कचरा टाकल्यामुळे पाण्याचा निचरा अडथळित होऊन पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखून नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Don`t copy text!