Home पाचोरा गावाच्या प्रेमातून देशसेवेचे बळ मिळते; लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांचा परधाडेत नागरी...

गावाच्या प्रेमातून देशसेवेचे बळ मिळते; लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांचा परधाडेत नागरी सत्कार

गावाच्या प्रेमातून देशसेवेचे बळ मिळते; लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांचा परधाडेत नागरी सत्कार

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) : “माझ्या गावातील नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद आणि माझ्या परिवाराची साथ हीच माझी खरी ताकद आहे. गावाची ताकद माझ्या व माझ्या परिवारामागे असल्यानेच आम्हाला देशासाठी लढण्याचे आणि कर्तव्य पार पाडण्याचे बळ मिळते,” असे प्रतिपादन भारतीय सैन्य दलातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांनी केले.

पाचोरा तालुक्यातील परधाडे येथील सुपुत्र विनय पाटील यांची नुकतीच भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती झाल्याने गावातील नागरिकांच्या वतीने शनिवार (दि. 30 मे) रोजी त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, देशसेवा हे केवळ कर्तव्य नसून ती एक राष्ट्रभक्तीची भावना आहे. सैन्यातील प्रत्येक जवान आणि अधिकारी देशाच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असतो. अशा वेळी गावकऱ्यांचे प्रेम, कुटुंबाची साथ आणि समाजाचा विश्वास हीच सर्वात मोठी प्रेरणा ठरते. परधाडेकरांनी दिलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असून भविष्यातही देशसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा या सत्कारातून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विनय पाटील यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावातील युवकांनी त्यांचा आदर्श घेऊन सैन्य तसेच विविध क्षेत्रांत देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले.

या सत्कार समारंभास अशोक पाटील, रघुनाथ पाटील, भागवत पाटील, सुरेश पाटील, वसंत पाटील, लक्ष्मण महाजन, रामकृष्ण पाटील, गोरख वाघ, लतिफ तडवी, गोपाल पाटील, विलास पाटील, शशिकांत पाटील, महेंद्र सोनवणे, विजय ठाकरे, दिलीप महाजन, नितीन महाजन, सुनील पाटील, प्रफुल पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रतिक महाजन, प्रशांत पाटील, डीगंबर पाटील, किरण महाजन, सागर पाटील, अभय कोळी, सोनू राजपूत, वाल्मीक पाटील, छोटू शिंदे, विश्वास पाटील, श्रीराम चौधरी, रितेश पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लेफ्टनंट कर्नल विनय पाटील यांच्या पदोन्नतीमुळे परधाडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Don`t copy text!