जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज; पण सहकारींचा डोळ्यासमोर मृत्‍यू

जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज; पण सहकारींचा डोळ्यासमोर मृत्‍यू

पाचोरा प्रतिनिधी : कोकण, मुंबईसह महाराष्ट्र व गुजरातच्या अनेक भागात तौक्ते चक्रीवादळाने थैमान घालत प्रचंड नुकसान केले. यात वित्तहानीसह मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. समुद्रात बुडालेल्या अनेकांचा अजूनही शोध घेतला जात आहे. याच वादळात पाचोरा येथील रहिवासी वैभव पाटील हा मर्चंट नेव्हीचा जवान आठ तास समुद्रातील जीवघेण्या लाटांशी झुंजत बचावला असून, या जवानाचा पाचोरा येथे सत्कार करण्यात आला.
येथील गोविंदनगरी भागातील माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबई येथे नियुक्ती मिळाली. तौक्ते चक्रीवादळ मुंबईवर धडकले. त्यावेळी वैभव समुद्रात जहाजावर कार्यरत होता.

अन्‌ सुखरूप बाहेर.
समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटांमुळे वैभव व त्याचे सहकारी असलेले जहाज बुडाले. त्या वेळी त्याने हिंमत न हारता जिद्दीने समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज दिली. अशावेळी इंडियन नेव्हीचे मदतीसाठीचे जहाज वैभवपर्यंत पोहोचले. समुद्रात अक्षरशः मृत्यूशी झुंज देत असलेल्या वैभवने विशिष्ट प्रकारच्या खाणाखुणा करत मदतीसाठी आलेल्या इंडियन नेव्हीच्या जहाजास आपल्याजवळ बोलवल्यानंतर त्यास समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पालिकेचे गटनेते संजय वाघ यांच्या हस्ते वैभव पाटील यास सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वैभवचे वडील माधवराव पाटील, मुख्याध्यापक सुभाष गोसावी, हारुण देशमुख आदी उपस्थित होते.

अंगावर काटा आणणारा थरार..
नशीब बलवत्तर तसेच प्रशिक्षण काळात लाटांशी झुंज देण्याचे मिळालेले प्रशिक्षण आणि जिद्द यामुळे वैभव वाचला. तो सध्या पाचोरा येथे आला असून, तौक्ते वादळाचा त्याच्याकडून कथन होत असलेला थरार ऐकून साऱ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला.