Home पाचोरा संघर्षातून तेजस्वी यशाकडे: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत

संघर्षातून तेजस्वी यशाकडे: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत

संघर्षातून तेजस्वी यशाकडे: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. एक शिक्षक म्हणून जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधते, तेव्हा मला नेहमीच वाटते की बाबासाहेबांचे जीवन विद्यार्थ्यांसमोर मांडले गेले पाहिजे, कारण त्यातून मिळणारी शिकवण आयुष्य बदलणारी आहे. म्हणूनच आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी हे विचार शब्दात मांडून इच्छिते.

 

आपल्या सर्वांना माहितीच आहे की बाबासाहेबांचा जन्म अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत झाला. समाजातील जातीय भेदभाव, अपमान आणि अनेक अडचणी त्यांनी लहानपणापासून सहन केल्या. शाळेत त्यांना वेगळं बसवलं जायचं, पाणी सुद्धा सहज मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी असलेले अनेक जण खचून गेले असते, पण बाबासाहेबांनी हार मानली नाही. त्यांनी ठामपणे ठरवले की शिक्षणाच्या जोरावरच आपण या अन्यायाला उत्तर देऊ शकतो आणि हा समाज बदलू शकतो.

आजच्या विद्यार्थ्यांनी येथे एक महत्त्वाचा धडा घ्यायला हवा की परिस्थिती कशीही असली तरी मात्र शिक्षणाचा मार्ग सोडायचाच नाही. आपल्याकडे आज सर्व सुविधा आहेत, मोबाईल आहे ,इंटरनेट आहे डिजिटल शिक्षणाच्या सुविधाही उपलब्ध आहे,तरीही आपण अभ्यास करणे टाळतो, आळस करतो किंवा थोड्याशा अपयशाने निराश होतो आणि हीच गोष्ट बदलण्याची गरज आहे.

बाबासाहेबांनी *“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”* हा संदेश दिला. हा केवळ एक घोषवाक्य नाही तर तो जीवनाचा मार्ग आहे. शिक्षण हे माणसाला केवळ ज्ञान देत नाही, तर त्याला विचार करण्याची, योग्य-अयोग्य ओळखण्याची ,अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची आणि स्वतःचा मार्ग तयार करण्याची ताकद देते. आपला भारत हा तरुणांचा देश आहे आणि उद्याचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. पण हे भविष्य घडवण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, तर त्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करणे सुद्धा आवश्यक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला हेच शिकवले की मोठे स्वप्न पाहा आणि त्या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करा.

आज अनेक विद्यार्थी लहानसहान अडचणींना घाबरून आपली जिद्द सोडून देतात. परीक्षेत अपयश आले की आत्महत्या हा पर्याय निवडतात, एखादा विषय कठीण वाटला की लगेच निराश होतात. परंतु बाबासाहेबांचे जीवन आपल्याला सांगते की अपयश हा शेवट नसतो, तर तो यशाकडे जाणारा एक टप्पा असतो. आणि बाबासाहेबांचे जीवन आपल्याला हे सांगते की संघर्षाशिवाय यश मिळत नाही, आणि जो संघर्षाला सामोरे जातो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.

एक शिक्षिका म्हणून माझे असे मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्यात प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष आहे. फक्त त्या गुणांना ओळखण्याची आणि त्यावर मेहनत करण्याची गरज आहे. मोबाईल, सोशल मीडिया यामध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी तो वेळ अभ्यासासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी वापरला पाहिजे.

बाबासाहेबांचे जीवन आपल्याला एकतेचे महत्त्व शिकवते म्हणजे एकत्र राहून, एकमेकांना मदत करून आपण मोठ्या मोठ्या अडचणींवर मात करू शकतो. म्हणूनच त्यांनी “संघटित व्हा” हा संदेश दिला.

शेवटी, बाबासाहेबांचे जीवन आपल्याला एकच गोष्ट स्पष्टपणे सांगते परिस्थिती कितीही कठीण असली तरी, जिद्द, मेहनत आणि शिक्षण यांच्या जोरावर आपण आपले भविष्य बदलू शकतो.

म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने आजच एक संकल्प करावा कोणतीही अडचण आली तरी हार मानायची नाही, शिक्षणाचा मार्ग सोडायचा नाही आणि आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्न करत राहायचे.

कारण…परिस्थिती नाही, तर आपली जिद्द आपले भविष्य घडवते. आणि संघर्षातूनच यशाचा मार्ग तयार होतो.

 

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे केवळ इतिहास नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा देणारे मार्गदर्शन आहे. त्यांच्या संघर्षातून आपल्याला शिकायला मिळते की कोणतीही परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही, जर आपल्या मनात जिद्द, ध्येय आणि मेहनतीची तयारी असेल तर.

चला, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एक निश्चय करूया की

अडचणींना घाबरायचे नाही, अपयशाने खचायचे नाही आणि शिक्षणाचा मार्ग कधीही सोडायचा नाही.

कारण…“जिद्द असेल तर मार्ग नक्की सापडतो, आणि संघर्ष असेल तर यश नक्की मिळते.

 

 

प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ

श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा

Don`t copy text!