राष्ट्रसंत सेवालाल महाराजांचा इतिहास शाळांमध्ये शिकवावा

राष्ट्रसंत सेवालाल महाराजांचा इतिहास शाळांमध्ये शिकवावा

सकल बंजारा समाजाचे तहसीलदार, प्रांत अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

 

 

पाचोरा | प्रतिनिधी

राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा व इतिहासाचा परिचय शाळांमधील विद्यार्थ्यांना करून द्यावा, अशी मागणी सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पाचोरा तहसीलदार साहेब, प्रांत अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी साहेब यांना शेकडो सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचा इतिहास, विचार व समाजासाठीचे योगदान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मात्र सध्या त्यांच्या इतिहासावर आधारित संदर्भ साहित्य व पुस्तके अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने सविस्तर आणि प्रमाणित माहिती सर्वसामान्यांना मिळणे कठीण होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक किसन सूर्यवंशी यांनी राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या इतिहासाची सत्य व अभ्यासपूर्ण मांडणी केलेली असून, त्या ग्रंथाचा संदर्भ साहित्य म्हणून उपयोग करून तो इतिहास शाळा व महाविद्यालयांमध्ये शिकवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर पाचोरा तालुक्यातील विविध तांड्यांमधील शेकडो समाजबांधवांच्या सह्या असून, या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. निवेदनावर श्री. दत्तूभाऊ जाधव, शिवदास राठोड सर, अरविंद पवार, योगेश जाधव, प्रकाश पवार, आत्माराम राठोड, राजू राठोड, गोपीचंद चव्हाण, प्रवीण चव्हाण, श्रीराम राठोड, पितांबर नाईक, कृष्णा जाधव, सचिन राठोड आदींसह अनेक समाजबांधवांच्या सह्या आहेत.

बंजारा समाजाच्या या मागणीमुळे राष्ट्रसंत सेवालाल महाराजांचे विचार व कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.