कु.चेतना हिरेच्या आयुष्यातील ‘प्रकाशस्तंभ’ ठरलेल्या प्रा. जयश्री वाघ मॅडम : गुरु-शिष्य नात्याचे हृदयस्पर्शी ऋण व्यक्त मनोगत…!
पाचोरा | प्रतिनिधी
कॉलेज जीवनात मिळणारे काही शिक्षक हे केवळ अध्यापक न राहता विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे शिल्पकार ठरतात. अशीच भावना चेतना हिरे हिने आपल्या मनोगतातून व्यक्त केली असून, तिच्या यशामागील प्रेरणास्थान म्हणून प्रा. सौ. जयश्रीताई वाघ मॅडम यांचे नाव कृतज्ञतेने घेतले आहे.
श्री. शेट मुरलीधरजी मानसिंगका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना चेतना हिरे हिच्या आयुष्यात प्रा. जयश्रीताई वाघ मॅडम या कायम मार्गदर्शक म्हणून उभ्या राहिल्या. वरील फोटोतही स्पष्टपणे दिसून येते की, त्या नेहमीच चेतनाच्या सोबत मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपस्थित राहिल्या आहेत, असे चेतनाने भावनिक शब्दांत नमूद केले आहे.
गेल्या दोन वर्षांत चेतना हिरे हिला मिळालेली विविध बक्षिसे, सन्मान आणि यश यामागे फक्त आणि फक्त आपल्या गुरु, मार्गदर्शक आणि शिक्षक प्रा. सौ. जयश्रीताई वाघ मॅडम यांचेच योगदान आहे, असे तिने ठामपणे सांगितले. “या काळात मी जे काही मिळवले, ते सर्व त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले,” अशी कृतज्ञ भावना तिने व्यक्त केली.
कॉलेज जीवनातील कठीण प्रसंग, मानसिक खचलेपण आणि संभ्रमाच्या काळात प्रा. जयश्रीताई वाघ मॅडम यांनी चेतनाला केवळ दिशा दिली नाही, तर आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि पुढे जाण्याची नवी ऊर्जा दिली. त्यामुळेच त्या चेतनाच्या आयुष्यात ‘प्रकाशस्तंभ’ ठरल्याचे ती अभिमानाने सांगते.
“मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण माझ्या आयुष्यात असे शिक्षक लाभले, ज्यांनी माझ्या आयुष्याचे सोने केले,” असे शब्द वापरत चेतना हिरे हिने आपल्या गुरूंप्रती ऋण व्यक्त केले.
आज चेतना हिरे आपल्या यशाकडे पाहताना नम्रतेने सांगते की, शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात — आणि प्रा. सौ. जयश्रीताई वाघ मॅडम हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत.
























