Home पाचोरा कु.चेतना हिरे हिला शालेय जीवनात स्वप्नांना पंख देणाऱ्या श्रीम.पी डी बडोला माध्यमिक...

कु.चेतना हिरे हिला शालेय जीवनात स्वप्नांना पंख देणाऱ्या श्रीम.पी डी बडोला माध्यमिक विद्यालय वरखेडी येथील शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम

कु.चेतना हिरे हिला शालेय जीवनात स्वप्नांना पंख देणाऱ्या श्रीम.पी डी बडोला माध्यमिक विद्यालय वरखेडी येथील शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम

 

 

 

“आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात, ज्या नकळत आपल्या आयुष्याला नवी दिशा देऊन जातात.

त्यांच्या एका प्रोत्साहनामुळे आपल्यातील सुप्त गुणांना नवे पंख मिळतात आणि आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा मिळते.

माझ्या शालेय जीवनातही अशीच एक व्यक्ती मला लाभली त्या म्हणजे माझ्या मराठीच्या शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम.

त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान शिकवले नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवायला आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला शिकवले.”

 

माझे इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित श्रीमती प्याराबाई धनराज बडोला माध्यमिक विद्यालय, वरखेडी ता. पाचोरा जि. जळगाव येथे झाले.

पाचवी ते सातवीपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात, तर आठवी ते दहावीपर्यंत दुपारच्या सत्रात भरायची.लहानपणापासूनच मला बोलण्याची आणि लिहिण्याची खूप आवड होती; मात्र ती आवड फक्त शाळेपुरतीच मर्यादित होती. आठवीत गेल्यानंतर माझा परिचय मराठीच्या शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम यांच्याशी झाला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली.

मॅडमनी माझ्यातील लिखाण आणि वक्तृत्वाची आवड ओळखली आणि मला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.

आजही मला तो दिवस स्पष्ट आठवतो…

सन २०१८ मध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पाचोरा तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक शाळेतून तीन निबंध पाठवायचे होते. तेव्हा मॅडमनी मला सांगितले, “तू निबंध लिही, आपण तो स्पर्धेसाठी पाठवूया.”

परंतु मी थोडी घाबरले होते. मी मॅडमना म्हणाले, “मला निबंध लिहिताच येत नाही… मी कसा लिहू?”

तेव्हा मॅडमनी केवळ मला धीरच दिला नाही, तर निबंध कसा लिहायचा, परिच्छेद कसे मांडायचे, मुद्दे कसे मांडायचे, अगदी ओळी काढण्यापासून ते विचारांची मांडणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत संयमाने शिकवली.

आणि त्यांच्या त्या अमूल्य मार्गदर्शनामुळे माझा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आला.

ते बक्षीस माझ्या आयुष्यातील पहिलेच बक्षीस होते. त्या दिवशी मला जितका आनंद झाला होता, त्याहून अधिक आनंद मॅडमना झाला होता; कारण त्यांच्या विश्वासाला मी सार्थ ठरवले होते.

त्या दिवसापासून मॅडमनी सतत मला प्रोत्साहन दिले.

“तू यापेक्षाही अधिक चांगलं करू शकतेस,” हा त्यांचा विश्वास माझ्यात आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला.

पुढील वर्षी शेंदुर्णी संस्थेचे संस्थापक कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यांच्याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. पण मॅडमनी मला त्यांच्या जीवन कार्यावर असलेले पुस्तक दिले,योग्य मार्गदर्शन केले, माहिती कशी शोधायची, मुद्देसूद मांडणी कशी करायची हे शिकवले. त्यांच्या सहकार्यामुळे त्या वर्षी माझा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आला.

त्यानंतरच्या वर्षीही हीच स्पर्धा आयोजित करण्यात आली; मात्र त्या वेळी मॅडमची बदली दुसऱ्या गावी झाली होती. मला वाटले होते की आता मला मार्गदर्शन करणारे कोणीच राहिले नाही. पण मॅडमनी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवत सांगितले,

“तू निबंध लिही… मी नक्की तुला मार्गदर्शन करेन.”

त्यांच्या त्या शब्दांनी पुन्हा माझ्यात नवी उमेद निर्माण झाली आणि त्या वर्षीही मी यश संपादन केले.

शालेय जीवनात त्यांनी मला केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर माझ्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून दिले. माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले आणि स्वप्न पाहण्याची हिंमत दिली.

आज शाळा सोडून पाच वर्षे झाली असली, तरी त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे शब्द आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आजही माझ्यासोबत कायम आहे.

शिक्षक हे फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यालाही योग्य दिशा देत असतात. माझ्या आयुष्यात संगीता सूर्यवंशी मॅडम या अशाच एका प्रेरणादायी शिक्षिका ठरल्या.

त्यांनी माझ्यातील गुण ओळखले, मला घडवले आणि प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणूनच आजही माझ्या प्रत्येक यशामागे त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा मोठा वाटा आहे.

खरंच, आयुष्यात काही शिक्षक हे फक्त शिक्षक राहत नाहीत… ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा कायमस्वरूपी प्रेरणास्रोत बनून जातात.

 

कु. चेतना रणदीप हिरे

Don`t copy text!