कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना तातडीने आवश्यक सुविधा पुरवाव्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कृती दल बैठकीत निर्देश

कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या
बालकांना तातडीने आवश्यक सुविधा पुरवाव्यात
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कृती दल बैठकीत निर्देश

जळगाव, दि. 2 – जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबांना शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या सुविधांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ‘कोविड-19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची (Task Force) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त् सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते तर पोलीस निरिक्षक बापू रोहोम, जिल्हा बालकल्याण समितीच्या वैजयंती तळेले व इतर अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले हेाते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या बालकांचा विषय संवेदनशील आहे. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड 19’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच ‘कोविड 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना वेळेत पूर्ण करावयाच्या आहेत.
‘कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. त्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सहकार्य करावे. अशा बालकांच्या संपर्कात राहत त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होईल याची दक्षता घ्यावी. या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तसेच कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना पात्रतेचे निकष तपासून शासनाच्या विविध निराधार योजनांचा लाभ मिळवून द्यावा शिवाय त्यांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी. जी बालके नातेवाईकांकडे राहत असतील त्यांचा नियमानुसार सांभाळ करण्याबाबत सुचना देणे, दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करणे, पालकांचे शिक्षण व इतर बाबींसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले.
जिल्ह्यात सध्या दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 9 असून यापैकी 7 बालके हे 18 वर्षाच्या आतील तर 2 बालके 18 वर्षावरील आहेत. तर एक पालक मृत्यु पावलेल्या बालकांची संख्या 191 इतकी असून त्यापैकी 134 बालके हे 18 वर्षाच्या आतील, 52 बालके 18 वर्षावरील तर 5 बालके हे एक वर्षाखालील आहेत. जळगाव महानगरपालिकेकडून कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या 319 पालकांची यादी प्राप्त झाली आहे. त्याची पडताळणी करण्याची कार्यवाही सुरु आहे. दवाखान्यात दाखल असलेल्या पालकांची संख्या 11 असून कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांची संख्या 153 इतकी असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत सांगितले.
*mबालकांसाठी हेल्पलाइन
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये ज्या बालकांचे पालक मृत्यू पावलेले आहेत, अशा बालकांसाठी तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रूग्णालयात दाखल असल्याने त्यांची काळजी व संरक्षणाचा प्रश्न निर्माण होऊन त्यांची देखभाल होऊ शकत नाही. अशा संकटामध्ये सापडलेली बालके आढळून आल्यास अथवा माहिती मिळाल्यास त्याची माहिती चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक 1098, बालगृह 7378490960/9420389115, अध्यक्ष, बालकल्याण समिती 7588010036, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी 9423954912, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी 8308177811, जिल्हा बाल संरक्षण कक्ष मदत केंद्र 8007986557/7249118161, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय 0257-2228828, जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालय 0257-2228825 वर द्यावी. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. परदेशी यांनी केले आहे.