खानदेशच्या लौकिकात मानाचा तूरा – डॉ. शामकांत देवरे यांच्या कडे महत्वपूर्ण जबाबदारी

खानदेशच्या लौकिकात मानाचा तूरा – डॉ. शामकांत देवरे यांच्या कडे महत्वपूर्ण जबाबदारी

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबरोबरच मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडाळाच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठी विश्वकोशासारखा सर्वविषयसंग्राहक असा संदर्भग्रंथ तयार करण्याचेही काम हाती घेण्यात आले. सन १९८० मध्ये या मंडळाचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना करण्यात आली. मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीचा प्रचार व प्रसार करून जिज्ञासू वाचकांना लेखनासही प्रवृत्त करणे, हा त्याच्या निर्मितीमागील प्रमुख हेतू. हे मंडळ या प्रकल्पपूर्तीची संकल्पना प्रत्यक्ष रीत्या राबवित आहे. या मंडळाच्या सचिवपदी (राजपत्रित, वर्ग १) नुकतीच उच्चविद्याविभूषित असलेले खानदेशचे सुपुत्र डॉ. शामकांत देवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ. देवरे हे मूळचे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी खडकदेवळा ते गोंदेगाव अशी रोज पायपीट करीत आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी रोजंदारीवर काम करून पूर्ण केले. एम. ए.; एम. बी. ए.; एम. एल. एल. अँड एल. डब्ल्यू.; आणि पीएच. डी. पर्यन्त त्यांनी शिक्षण घेतले असून यापुढे पोस्ट डॉक्टरेट करण्याचा त्यांचा मानस आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सुरुवातीला १२ वर्ष काम केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आपला अभ्यास सुरू ठेवला. सन २००१६ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागात प्रशासन अधिकारी म्हणून त्यांची प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर मागील पाच वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सहायक सचिव (राजपत्रित, वर्ग २) या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे सचिव पदाचाही कार्यभार सोपविण्यात आला होता. आता अनेक वर्ष रिक्त असलेल्या सचिवपदावर डॉ. देवरे यांची नियुक्ती झाल्याने विश्वकोशाच्या प्रस्तावित उपक्रमांना गती मिळणार आहे. मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण, कुमार विश्वकोश, ऑलिम्पिक कोश, तसेच ज्ञानमंडळांच्या नोंदींना चालना देणे आदी कामे त्यांना प्राधान्याने हाताळता येतील.
विश्वकोश मंडळाचे उपकार्यालय वाई (सातारा) येथे असून खानदेशचेच सुपुत्र असलेल्या तर्कतीर्थांनी येथूनच विश्वकोश निर्मितीचे काम सुरू केले. याच कार्यालयात डॉ. देवरे रुजू झाल्यापासून त्यांनी मराठी विश्वकोशासारख्या संदर्भग्रंथाचे ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवण्याचे, तसेच वाचकांची जिज्ञासा जागृत ठेवण्याचे काम हाती घेत महाराष्ट्रभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांच्याकडे राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदाचाही कार्यभार सोपविण्यात आला. मराठी भाषेचा राज्यभर आणि राज्याबाहेरही प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मराठी भाषा विभागाच्या महत्त्वाच्या चार विभागांपैकी दोन विभागाची धुरा या खानदेश सुपुत्राकडे विभागाने सोपविलेली आहे. डॉ. देवरे यांना मिळालेल्या या बढतीमुळे पुन्हा एकदा खानदेशचा नावलौकिक वाढला आहे.