एरंडोल नगरपरिषदेसाठी गटनेते व प्रतोदपदाची निवड जाहीर
एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला माय-बाप जनतेने स्पष्ट जनाधार देत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले.
या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षासह शिवसेना पुरस्कृत अपक्ष गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, एरंडोल शहरप्रमुख बबलू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रूपेश महाजन, अतुल महाजन, आनंद दाभाडे, महेश देवरे यांच्यासह शिवसेना व शिवसेना पुरस्कृत अपक्ष गटातील नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत शिवसेना पक्षातर्फे गटनेतेपदी – प्रा. मनोज पाटील, प्रतोदपदी – छायाताई आनंद दाभाडे तर शिवसेना पुरस्कृत अपक्ष गटातर्फे गटनेतेपदी – अमोल तंबोली, प्रतोदपदी – आरतीताई महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली. यानिमित्ताने आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“माय-बाप जनतेने आपल्यावर विश्वास ठेवत भरभरून जनादेश दिला आहे. आता ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आपले कर्तव्य आहे. विकासाचे जे व्हिजन जनतेसमोर मांडले आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्द, प्रामाणिकपणा व एकजुटीने काम करा. शहरातील नागरिकांच्या सुख-दुःखात नेहमी उपस्थित रहा, दैनंदिन समस्या तातडीने सोडवा आणि नगरपरिषदेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक वागणूक द्या. राजकारण डोक्यात न ठेवता १०० टक्के समाजकारणावर भर द्या.”

















