चोपडा महाविद्यालयात ‘Android App Development’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने “MIT App Inventor वापरून Android App Development” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना कोडिंगशिवाय Android अॅप कसे विकसित करता येते याची सखोल माहिती देणे हा होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. बागुल व पर्यवेक्षक डॉ. ए. एन. बोरसे यांनी मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. सदर कार्यशाळा इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. के. डी. गायकवाड व डॉ. एल. बी.पटले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. के. डी. गायकवाड यांनी केले.
सदर कार्यशाळेमध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष पदवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये महाविद्यालयासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेदरम्यान MIT App Inventor या सोप्या व प्रभावी प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने अॅप डेव्हलपमेंटचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ESA (Electronics Students Association) च्या विद्यार्थ्यांनी नियोजन, तांत्रिक मदत व व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरली.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल अॅप डेव्हलपमेंटविषयीची आवड वाढली असून भविष्यातील तांत्रिक कौशल्य विकासासाठी ही कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरली आहे.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सौ. पूनम गायकवाड यांनी केले तर आभार प्रतीक सैंदाणे यांनी मानले.या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

















