चाळीसगाव येथे माजी विद्यार्थ्यांनी सुरू केले कोविड विलगीकरण कक्ष रुग्णाश्रम

चाळीसगाव येथे माजी विद्यार्थ्यांनी सुरू केले कोविड विलगीकरण कक्ष रुग्णाश्रम

सध्या कोरोनाने सर्वत्र डोके वर काढले आहे. रुग्णांना दवाखान्यात जागा मिळत नाही, मिळाली तर ऑक्सिजन नाही, रेमडीसीविर इंजेक्शन नाही, योग्य त्या सुविधा आज रुग्णांना मिळत नसल्यामुळे रुग्णांची अधिक फरपट होत आहे. त्यातल्यात्यात कोविड हॉस्पिटल सर्वत्र फुल्ल झाली आहेत. असे सर्व असताना चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाचे सन २००२ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी शहरातच ५० बेड असलेले रुग्णाश्रम नावाने कोविड रुग्णांसाठी विलीगिकरण कक्षाची सोय केली आहे.

ना नफा ना तोटा या तत्वावर या कोविड विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे तमाल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सन २००२ या वर्षातील हे माजी विद्यार्थी असून त्यांनी अगोदर व्हाट्सउप ग्रुप तयार करून त्यावर चर्चा केली असता त्या ग्रुपमधील जवळपास १२० जणांनी मदतीचे आश्वासन देऊन कोविड रुग्णांना एकप्रकारे मदतीचा एक हात देऊ केला आहे. त्यांच्याजवळ सध्या एक लाख रुपये जमा झाले आहेत. त्यातून जे-जे मेडिकल साहित्य लागेल ते त्यांनी अगोदरच खरेदी केले आहे. तसेंच त्याठिकाणी कॉलेजमधील पडून असलेले साहित्याचा देखील त्यांनी योग्य वापर केला आहे.
हे कोविड विलगीकरण कक्ष धुळे रोडस्थित असलेल्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित के. आर. कोतकर कॉलेजच्या ट्रॅक ग्राऊंडच्या बाजूला बॉईज होस्टेलमध्ये सुसज्ज असे कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन २ मे रोजी कोविड सेंटरचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबेळकर, आ. मंगेश चव्हाण, पाणी फाउंडेशनचे सर्वासर्वे डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले असून तेथे आज दोन रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले आहे. रुग्णांनी रुग्णाश्रमात दाखल होण्यासाठी खालील व्यक्तींशी संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे त्यात उमेश पवार, तमाल देशमुख, खुशाल चव्हाण, सचिन आमले, चुडामण पाटील, मिलींद पवार, डॉ. सुधीर देसले, धनंजय सोनवणे, विशाल सोनगीरे, उमेश महाजन, स्वप्नील राखुंडे यांच्याशी संपर्क साधावा. असे या माजी विद्यार्थ्यांना कळविले आहे.