कंत्राटी शिक्षकभरतीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होईल आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली भीती

कंत्राटी शिक्षकभरतीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होईल! आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली भीती

– सरकारी शाळांमधील शिक्षकभरती कंत्राटी पद्धतीने करण्यास विरोध
– राज्य सरकारने निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी
प्रतिनिधी,
राज्य सरकारच्या अनुदानित आणि सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. सरकारने पोर्टलद्वारे नियमित भरतीचे आश्वासन दिले असताना आता कंत्राटी भरतीचा विषय काढून सरकार या मुद्द्याला फाटे फोडत आहे. सरकारने शिक्षकभरती किंवा शासकीय-निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करू नये, अशी आग्रही मागणी आ. तांबे यांनी मागणी केली आहे.

राज्य सरकारने अनुदानित, सरकारी शाळांमधील शिक्षकांसह विविध शासकीय व निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक सध्या असलेली शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेत सरकारने आपल्या पोर्टलवरून नियमित भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे. मात्र तसं न करता आता या सरकारने कंत्राटी पद्धत लागू करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असं निरीक्षण आमदार सत्यजीत तांबे यांनी नोंदवलं.

सरकारी शाळेत शिक्षक होण्यासाठी तरुण अनेक परीक्षा देतात. त्यासाठी अभ्यास आणि मेहनत करतात. अशा वेळी कंत्राटदार कंपनीकडून खरोखरच प्रामाणिकपणे या कामासाठी पात्र असलेल्या लोकांचीच निवड केली जाईल का, असा प्रश्न आहे. ती झाली नाही, तर या तरुणांच्या भवितव्याचं आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं काय, असा सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारी सेवेसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची पद्धत चुकीची असल्याची भावनाही आ. तांबे यांनी व्यक्त केली. जनतेच्या कामांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या नोकरीच्या सुरक्षेची हमी नसेल आणि आर्थिक स्थैर्य नसेल, तर ते पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. त्याचा परिणाम लोकांना मिळणाऱ्या सेवांवर होईल. शिक्षण क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या क्षेत्राचा खेळखंडोबा होणं देशाला परवडणारं नाही, असंही आ. तांबे म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थी, युवक व शिक्षकांच्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

हा तर देशाच्या भवितव्याला धोका!
देशाची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षक मुलांवर योग्य संस्कार करून, त्यांना योग्य शिकवण देऊन पुढे पाठवत असतात. मात्र, अशा शिक्षकाला त्याच्या रोजगाराचीच शाश्वती नसेल, तर तो प्रामाणिकपणे आणि सचोटीने कसे काम करू शकेल? शिक्षकांनी उत्तम काम केलं नाही, तर त्याचा फटका संपूर्ण शिक्षण क्षेत्रालाच बसेल. पर्यायाने देशाचं भवितव्यही संकटात सापडेल. – आ. सत्यजीत तांबे.