अनाथ मुलांच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी लढणार- आ. सत्यजीत तांबेंनी घेतला निर्धार

अनाथ मुलांच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी लढणार- आ. सत्यजीत तांबेंनी घेतला निर्धार

– मुलांनी मागण्यांचे निवेदन सादर केले

प्रतिनिधी,

सरकारी नोकरीत अनाथांसाठी आरक्षण आहे. परंतु, त्यात अनेक अडचणी असल्याचे समोर आले आहे. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन अनाथ मुलांचे असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी लढण्याचा निर्धार आमदार सत्यजीत तांबेंनी केला आहे. या वेळी अनाथ मुलांनी आ. ताबेंना मागण्यांचे निवेदन दिले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही सत्यजीत तांबेंनी सातत्याने विद्यार्थ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करणाऱ्या सत्यजीत तांबेंनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे.

‘अनाथांची माय’ म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचा स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील काही अनाथ युवक-युवतींनी मुंबईमध्ये आ. तांबेंची भेट घेतली. तसेच अनाथांच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय यांच्याशी देखील मुलांची भेट घालून दिली. त्यांनीही हे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

प्रमिलासारख्या पालकांचं छत्र हरपलेल्या होतकरू मुलांना उभारी घेण्याकरिता मायेचा हात देण्याची नितांत गरज आहे. पुरेशा मदतीअभावी या मुलांच्या आयुष्याची दिशा हरवून जायला नको, म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी यापुढेही कटिबद्ध असणार आहे, असं आमदार सत्यजीत तांबेंनी सांगितले.

चौकट

ताई, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे

धुळ्याची प्रमिला शिरसाठ ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा भेटली. बालपणातच पितृछत्र हरपलेल्या प्रमिलाने स्वतःच्या जिद्दीवर समाजकार्य विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं. परंतु, “मला कोणीच नाही” अशी खंत तिने बोलून दाखवल्यावर मात्र मन हेलावलं. तिला धीर देत “तू माझ्या बहिणीसारखी असून भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे” असा धीर दिला.

– आमदार सत्यजीत तांबे