गळक्या एसटी बसमध्ये बसायचं का? – आमदार सत्यजीत तांबे यांची टीका

गळक्या एसटी बसमध्ये बसायचं का?
– आमदार सत्यजीत तांबे यांची टीका
– IRCTC च्या वेबसाईटवर तिकीट बुकिंगवरून केलं ट्वीट

प्रतिनिधी
विविध नागरी समस्यांवर परखडपणे भाष्य करणारे आमदार म्हणून आमदार सत्यजीत तांबे ओळखले जातात. आ. तांबे यांनी बुधवारी एसटी महामंडळाबद्दल ट्वीट करत महामंडळाच्या अवस्थेचं वास्तव मांडलं. एकीकडे राज्य सरकार एसटीची तिकिटं आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत असताना दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळातील बसगाड्यांची अवस्था बिकट असल्याचं वास्तव आ. तांबे यांनी ट्विटद्वारे मांडलं. विशेष म्हणजे त्यांनी दापोली येथील एका गळक्या बसचा व्हायरल झालेला व्हीडिओदेखील ट्विट केला आहे.

एसटी महामंडळाने आपली ऑनलाईन सेवा सक्षम करण्यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या संकेतस्थळासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता एसटीची तिकिटं आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर मिळणंही शक्य होणार आहे. एकीकडे एसटी महामंडळ तिकिटांच्या बाबतीत आधुनिक पवित्रा घेत असताना दुसऱ्या बाजूला महामंडळाच्या बसगाड्यांची अवस्था बिकट आहे.

काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत एक एसटी चालक छत्री उघडून बस चालवत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्याशिवाय पालघर, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही बसगाड्यांमध्ये पाणी गळत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं आढळलं होतं. तसंच एसटी बसचा निघालेला पत्रा लागल्याने एक तरुण जायबंदी झाल्याची घटनाही घडली आहे. एसटी बसचं छप्परही उडत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियाद्वारे समोर आलेत.

एसटी महामंडळाचा हा विरोधाभास आमदार सत्यजीत तांबे यांनी ट्विटद्वारे समोर आणला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे तिकीट बुक करून एसटी महामंडळाच्या गळक्या बसमध्ये बसायचे का, असा सवाल विचारत दापोली येथील एका गळक्या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हायरल व्हीडिओ शेअर केला आहे. त्याच वेळी त्यांनी एसटी महामंडळाचा विकास कुठे चालला आहे, असं शरसंधानही केलं.

एसटी ही ग्रामीण भागातील लोकांची जीवनवाहिनी आहे. अजूनही एसटीला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. पण महामंडळाकडून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बसगाड्या सेवेत असल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे फक्त दिखाऊ गोष्टींमध्ये तंत्रज्ञान आणि सुधारणा करण्यापेक्षा महामंडळाने एसटी गाड्यांची स्थिती सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे आणि सरकारनेही एसटी महामंडळ तगवण्यासाठी योग्य ती मदत करायला हवी, असं मत आमदार तांबे यांनी व्यक्त केलं