मरण स्वस्त होत असताना लेखक डॉ. भाऊसाहेब मिस्तरी

मरण स्वस्त होत असताना लेखक डॉ. भाऊसाहेब मिस्तरी

आपला देश स्वतंत्र होऊन साधारण सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरी ही इथला माणूस प्राथमिक सुविधांपासून वंचित राहातो ही तर खरी खंत आहे. आता कोरोनासारखी महामारी आली आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड भेटत नाही ही किती मोठी गोष्ट आहे. यापुढे प्रत्येक आमदार-खासदार यांना शासनाने पाच वर्षाच्या त्यांच्या कालखंडामध्ये ज्या परिसरातून ते निवडून येतात त्या परिसरात भव्य असं एक हॉस्पिटल बांधलं पाहिजे. आणि ही गोष्ट प्रत्येक लोक प्रतिनिधीला लागू करावी. हे काम जर त्यांच्याकडून झालं नाही तर त्या स्वतः लोकप्रतिनिधीला किंवा त्याच्या घरातल्या व्यक्तीला कुठल्याही निवडणुकीत परत उभं राहता येऊ नये असा नवा कायदा करण्यात यावा या कायद्याचा फायदा असा होईल की ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे. त्याला त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण आरोग्य विषयी सुविधा भेटतील. त्याचा जो परिणाम आहे तो शहरातल्या मोठ्या दवाखान्यावर अतिरिक्त भार जो आज येत आहे तो भविष्यात येणार नाही. तिथला मतदार किंवा तिथला माणूस हा आपल्या परिसरात हव्या त्या आरोग्यविषयक सुविधा घेऊ शकणार यापुढे अश्या सुविधा निर्माण व्हायला हव्यात. निदान या महामारी नंतर असा कायदा करण्यात यावा. आमदार, खासदार यांना पाच वर्षांच्या सेवेनंतर त्यांना पेन्शन लागू करतात पण आमदार यांना जे आयुष्यभर मतदान करून निवडून देतात त्यांच्या नशिबी निदान सुखाचे मरण तरी असावं.

पैसे घेऊन पार्ट्या करून मतदान करणे आता तरी बंद करावं जेणेकरून भविष्यात आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधीला लोकहिताचे काम करताना आपणच त्यांना नवी प्रेरणा द्यावी. मग भविष्यात कुठली महामारी आली तरी तिला तोंड देणं शक्य होईल. काही लोकांकडे आज पैसा असूनही मरण स्वस्त होत जात आहे. हे सारं आपण आज उघड्या डोळ्यांनी बघतच आहोत. या कोरोनाच्या मारामारी नंतर शासन दरबारी निदान हा विचार व्हावा आणि जनतेने ही विचार करावा या
महामारीतून काही तरी धडा घ्यावा नाहीतर पालथ्या घडावर पाणीच म्हणावा लागेल. असं काही भविष्यात होऊ नये म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेला मी विनंती करतो आपण दक्ष राहावं म्हणजे येणारा काळ हा खरंच आनंदाचा राहील.

● डॉ. भाऊसाहेब मिस्तरी
मो.9960294001
औरंगाबाद