मिठाबाई शाळेतील सेवकाचे शिक्षण पूरक कार्यात योगदान

मिठाबाई शाळेतील सेवकाचे शिक्षण पूरक कार्यात योगदान

पाचोरा – प्रतिनिधी
शाळा हे विद्येचे माहेरघर असते. शाळेत शिक्षणासोबतच संस्कार दिले जातात. मात्र शालेय कामकाजाचे श्रेय शाळेचे प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनाच प्राधान्याने मिळते. शालेय कामकाजातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान सहाजिकच दृष्टीआड राहून जाते. पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयातील एका सेवकाने आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन शिक्षण पूरक योगदान दिल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाचोरा येथील मिठाबाई कन्या विद्यालयाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करीत असताना पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत , वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी थोर नेते व राष्ट्र पुरुषांचे प्रतिमा विद्यालयास भेट दिल्या. या उपक्रमाची प्रशंशा होत असतानाच विद्यालयातील ज्येष्ठ सेवक हिरालाल दोधा परदेशी यांनीही खारीचा वाटा उचलून विद्यालयाला थोर राष्ट्रपुरुषांच्या पाच प्रतिमा भेट दिल्या. शालेय कामकाजातील शिक्षणाच्या मुख्य प्रवाहासोबत शिक्षण पूरक वातावरण निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या हिरालाल दोधा परदेशी या सेवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिरालाल परदेशी यांनी एका छोट्याशा कार्यक्रमात विद्यालयाला विद्येची देवता सरस्वती, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबव महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा भेट दिल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील पवार, प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत यांनी हिरालाल परदेशी यांचे कौतुक केले. याप्रसंगी आर.के. माळी, प्रमोद चौधरी, अनिल पवार, उज्वला देशमुख, कुंदा पाटील, शकील खाटीक, आबाजी पाटील, धनराज धनगर, शिवराम पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.