चोपडा महाविद्यालयाची ‘कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत’ विजयाची हॅट्रिक

चोपडा महाविद्यालयाची ‘कबचौ उमवि एकांकिका करंडक स्पर्धेत’ विजयाची हॅट्रिक
(सलग तीन वर्षी दमदार विजय)

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील एकांकिका टीमने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे आयोजित एकांकिका करंडक २०२३ स्पर्धेत ‘पडदा’ एकांकिका सादर करीत सलग तीन वर्षे दमदार विजय संपादन करून विजयाची हॅट्रिक संपादन केली आहे. त्यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘सत्कार समारंभाचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी कलावंत विद्यार्थी व संघ प्रमुख डॉ. हरेश गंभीर चौधरी तसेच दिग्दर्शक मकरंद चौधरी यांनी या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील, सचिव डाॅ.स्मिताताई पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच सदिच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे,समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, संघप्रमुख डॉ. हरेश चौधरी व दिग्दर्शक मकरंद चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघ प्रमुख डॉ. हरेश चौधरी यांनी केले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच संघप्रमुख व दिग्दर्शक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव एकांकिका करंडक स्पर्धा २०२३’ या स्पर्धेतील सर्वच प्रकारांमध्ये चोपडा एकांकिका समूहाने सलग तिसऱ्या वर्षी ‘पडदा’ ही एकांकिका सादर करीत विजयाची परंपरा कायम राखून भरघोस पारितोषिके प्राप्त केली. यामध्ये ‘पडदा’ एकांकिकेला सांघिक प्रथम एकांकिकेचे पारितोषिक प्राप्त झाले. तसेच हर्षल संजय पाटील या विद्यार्थ्याला संगीत योजनेचे प्रथम, पूनम भगवान बडगुजर या विद्यार्थिनीला दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, निलेश प्रकाश माळी व योगेश राजेश चित्रकथी या विद्यार्थ्याला प्रकाश योजनेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, रचना नंदकिशोर अहिरराव या विद्यार्थिनीला अभिनय स्त्री प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, हर्षल रघुनाथ निकम या विद्यार्थ्याला उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर तेजल राजेंद्र पाटील या विद्यार्थिनीने उत्कृष्ट अभिनय सादर करीत अभिनय नैपुण्य प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच सागर खैरनार, कुणाल रुकमे, शितल पाटील, छाया चित्ते, कोमल पाटील, कोमल भदाणे, पुरुषोत्तम पाटील, दिपेश शुक्ल, कुलभूषण दोडे या विद्यार्थ्यांनी बॅकस्टेज म्हणून भूमिका साकारली याआधी देखील उमवि करंडक स्पर्धेत ‘रंगबावरी’ व ‘म्याडम’ एकांकिकांनी अशीच दमदार कामगिरी व यश संपादन केल्याने हॅट्रिक साध्य करता आली असे मत संघ प्रमुख डॉ. हरेश चौधरी यांनी मनोगतात व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्पर्धेबाबतचे अनुभव कथन केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. के.एन.सोनवणे यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले तसेच स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘स्पर्धक विद्यार्थ्यांनी नियमित जिद्द, चिकाटी व अफाट कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास कोणतीही स्पर्धा जिंकण्याचे बळ आपोआपच प्राप्त होते. म्हणून प्रत्येक स्पर्धा विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून देते त्या संधीचे सोने करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाळगावी’.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.