विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि असोसिएट्स

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि असोसिएट्स

सादर केलेली कल्पना, डिझाईन, योजना व आराखडा सर्वोत्तम

विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग

जळगाव, दि ११ नोव्हेंबर  मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सादर केली कल्पना, डिझाईन, योजना व आराखडा सर्वोत्तम ठरल्याने त्यांची निवड झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्यातील तीन‌ नामांकिंत आर्किटेक्चर संस्थांपैकी शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची अंतिम निवड जाहीर केली आहे.

तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास १५ सप्टेंबर २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यानंतर या क्रीडा संकुलाच्या कामास वेग आला पाहिजे यासाठी पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव तथा क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांनी या कामात स्वतः लक्ष देत योजना आराखड्याच्या कामास गती दिली.

३ नोव्हेंबर २०२३ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यातील तीन नामांकित वास्तूविशारदांनी क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, क्रीडा संघटनाचे पदाधिकारी श्री राजेश जाधव , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रदीप तळवेलकर यांचा समावेश होता. या समितीने उत्तम संरचना, डिझाईन, योजना व आराखडा सादर करणाऱ्या शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची वास्तूरचनाकार तथा प्रकल्प सल्लागार म्हणून निवड केली आहे.

*कसे असेल विभागीय क्रीडा संकुल*

मेहरूण येथील गट नंबर ३४३ मधील १४.६५ हेक्टर क्षेत्रावर विभागीय क्रीडा संकुल साकार होणार आहे‌. या क्रीडा संकुलात क्रिकेट पॅव्हेलियन इमारत, क्रिकेट मैदान, ४०० मीटर ऍथलेटिक ट्रॅक, ऍथलेटिक पॅव्हेलियन बिल्डिंग, बहुउद्देशीय सभागृह, कमर्शियल कॉम्प्लेक्स, पृष्ठभाग पार्किंग, वसतिगृह इमारत, कर्मचारी इमारत, इनडोअर गेम्स हॉल, जलतरण तलाव, अतिथीगृह, शूटिंग रेंज, विविध भारतीय खेळांच्या सुविधा, हॉकी मैदान, हॉकी पॅव्हेलियन बिल्डिंग व चेंजिंग रूम अशा सुसज्ज सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सॉफ्टबॉल, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल या खेळांच्या सुविधा तसेच दिव्यांग खेळाडूंसाठी ही या विभागीय क्रीडा संकुलात सुविधा उपलब्ध असणार आहेत.

विभागीय क्रीडा संकुलासाठी वास्तूरचनाकारांची अंतिम निवड झाल्याने या क्रीडा संकुलाच्या कामास आता गतीने येणार आहे.