जळगाव शहरातील अंध अपंग मंडळाच्या मूक-बधिर विद्यालयाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांची भेट
जळगाव दिनांक : १४ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-जळगाव शहरातील अंध अपंग मंडळाच्या मूक-बधिर विद्यालयाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी भेट देऊन पाहणी केली.
भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. विद्यार्थी कृतीतून शिक्षण कसे आत्मसात करतात, याबाबतही त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रक्रियेचे निरीक्षण केले.
यावेळी करनवाल विद्यार्थ्यांमध्ये रमल्या आणि त्यांच्या विविध उपक्रमांविषयी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढवला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे विशेष मुलांच्या शिक्षणाबाबत जिल्हा परिषदेची सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका अधोरेखित झाली.

















