Home पाचोरा पाचोऱ्यात धडक कारवाई : सिलेंडर साठवणुकीवर प्रशासनाचा आळा

पाचोऱ्यात धडक कारवाई : सिलेंडर साठवणुकीवर प्रशासनाचा आळा

पाचोऱ्यात धडक कारवाई : सिलेंडर साठवणुकीवर प्रशासनाचा आळा

 

 

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा

पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवणूक करून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारावर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. पुरवठा विभाग आणि पाचोरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यात एकूण १८ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, अकबर मशिदखान (वय ३८, रा. जारगाव चौफुली) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांना संबंधित ठिकाणी अवैध साठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत संयुक्त कारवाईचे नियोजन केले.

दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात घराखालील गोडाऊनमध्ये एचपी, GAS-ONE, BPCL व HPCL कंपनीचे एकूण १८ सिलेंडर आढळले. यामध्ये १४ व्यवसायिक व ४ घरगुती सिलेंडर, तसेच ९ भरलेले व ९ रिकामे सिलेंडर असल्याचे निष्पन्न झाले. पंचांसमक्ष पंचनामा करून सर्व सिलेंडर जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपी अकबर मशिदखान घटनास्थळी आढळून आला असून, चौकशीत सिलेंडर स्वतःच्या मालकीचे असल्याची कबुली त्याने दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अन्वये पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्वलनशील गॅस सिलेंडरचा अवैध साठा हा गंभीर धोका निर्माण करणारा प्रकार असून निवासी भागात अशी साठवणूक होणे धोकादायक ठरू शकते. प्रशासनाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

या कारवाईत पुरवठा निरीक्षक राहुल पवार, लिपिक शुभम सपकाळे, सोमनाथ मिस्तरी, भाग्यश्री देवढे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.

Don`t copy text!