शिक्षण म्हणजे मानवातील स्वत्व व सत्वाची ओळख करून देणारे साधन : -प्रा. साहेबराव भूकन

शिक्षण म्हणजे मानवातील स्वत्व व सत्वाची ओळख करून देणारे साधन : -प्रा. साहेबराव भूकन

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने शिक्षणाचे महत्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आलेले होते. या कार्यशाळेच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी तर उदघाटक व कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून खिरोदा येथील शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्रा.डॉ.साहेबराव भूकन, पाचोरा येथील उपप्राचार्य प्रा. डॉ. जिजाबराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच मान्यवरांच्या हस्ते कै.मा.ना.सौ.अक्कासो. शरच्चंद्रिका सुरेश पाटील आणि संस्थापक अध्यक्ष तसेच माजी आमदार मा.कै.डॉ.दादासाहेब सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच परिचय विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शैलेशकुमार वाघ यांनी करून दिला.
यावेळी प्रास्तविक करतांना ते म्हणाले की, भारतीय शिक्षण व्यवस्था, प्राचीन शिक्षण पद्धती व आधुनिक युगातील शैक्षणिक प्रवाह विद्यार्थ्यांना अवगत व्हावा तसेच शिक्षणामुळे जनमानसात झालेला सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक सकारात्मक बदल हे समजून घेणे देखील महत्वाचे आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने शिक्षणाचे महत्व सर्व घटकांना पटवून देणे हा या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश आहे.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करण्यासाठी शिकू नये तर त्यांनी एक सुजाण नागरिक म्हणून राष्ट्र विकासात योगदान देण्यासाठीचे माध्यम म्हणून शिक्षणाकडे पहावे’.
या उदघाटन सत्राचे सूत्रसंचलन मुकेश बी.पाटील यांनी केले तर डॉ.ए.बी. सूर्यवंशी यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रा.डॉ. साहेबराव भूकन यांनी ‘शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाची पार्श्वभूमी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी ते म्हणाले की, ‘शिक्षण हे मानवाच्या जन्मापूर्वीपासूनच सुरू होते. शिक्षण म्हणजे संस्काराची शिदोरी आहे. शिक्षणामुळे मानवी कौशल्यांचा विकास होवून मानव आज प्रगत व सुसंस्कृत जीवन जगत आहे. शिक्षण म्हणजे स्वत्व व सत्व यांची ओळख करून देणारे माध्यम आहे. शिक्षणामुळेच मानवात आत्मविश्वासाची निर्मिती होते’.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ. जिजाबराव पाटील म्हणाले की, ‘शिक्षण हे अतिशय प्रभावी माध्यम असून त्याचा योग्य वापर केल्यास व्यक्तीचा महत्तम विकास साधला जावून त्या माध्यमातून लोककल्याण साधले जाते.यावेळी प्रा. पाटील यांनी विनोदी शैलीत विविध उदाहरणे व दाखले देवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
तिसऱ्या सत्रात प्रा.ए.ए. न्ह्यायदे यांनी ‘शिक्षण प्रवाह आणि आधुनिकता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे उपस्थित होते. यावेळी समारोपीय मनोगत व्यक्त करताना प्रा. कोल्हे म्हणाले की, ‘या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व कळले असून विद्यार्थी निश्चितपणे स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील व राष्ट्र विकासाला हातभार लावतील. ‘शिक्षण हे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे व याचा जीवनात पदोपदी उपयोग होतो’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील ८० विद्यार्थी व अध्यापक सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती सदस्य डॉ.ए. बी.सूर्यवंशी, डॉ.एम.एल. भुसारे, डॉ.आर.आर.पाटील, मुकेश बी.पाटील, मयूर पाटील, मोतीराम पावरा, एस. जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.