निशुल्क वारकरी बालसंस्कार शिबिराचे पाचोऱ्यात आयोजन
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य व दिव्य मुला-मुलींचे वारकरी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर पूर्णपणे निशुल्क असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना भगवद्गीता, हरिपाठ, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे पठण शिकवले जाणार आहे. तसेच पावल्या, पखवाज वादन, गायन, योगासने, व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व आध्यात्मिक मूल्ये रुजविणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
शिबिराच्या समारोप समारंभात मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या उज्वल व सुसंस्कृत भविष्यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींना या शिबिरात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे शिबिर पाचोरा येथील वारकरी भवन, रामदेव लॉन्सच्या मागे, जारगाव चौफुली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर व अनाथांची माय सुनीताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून अधिक माहितीसाठी 9545855243 व 7798755431 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.




















