Home पाचोरा संघर्षातून घडलेलं यश –कु.मुस्कान शफीकखान पठाण यांचा “माँ से बेटी सवई” या...

संघर्षातून घडलेलं यश –कु.मुस्कान शफीकखान पठाण यांचा “माँ से बेटी सवई” या उपक्रमाअंतर्गत लिनेस क्लब पाचोरा तर्फे सत्कार 

संघर्षातून घडलेलं यश –कु.मुस्कान शफीकखान पठाण यांचा “माँ से बेटी सवई” या उपक्रमाअंतर्गत लिनेस क्लब पाचोरा तर्फे सत्कार

 

कु. मुस्कान शफीकखान पठाण यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, जिद्द आणि मेहनतीचं सुंदर उदाहरण आहे. लहान वयातच त्यांच्या आयुष्यात मोठं दुःख आलं. त्या 5 वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झाले व त्यांच्यावरचे पितृछत्र हरपले. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी हार न मानता पुढे जाण्याचा निर्धार केला.

 

त्यांचं शिक्षण ८वी ते १०वी पर्यंत जागृती विद्यालय येथे झालं. त्यानंतर ११वी-१२वी त्यांनी एस.एन.डी. तावरे कन्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न पाहिलं.

 

घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत आणि आई फरजानाबी यांच्या कष्टांची जाणीव मनात ठेवून, आईला घरात हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी 24 डिसेंबर 2021 रोजी श्रीकृष्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना कोणताही अनुभव नव्हता, पण रुग्णालयात काम करताना त्यांनी सर्व काही नव्याने शिकले. इंजेक्शन देण्यापासून ते इतर वैद्यकीय कामांपर्यंत सर्व गोष्टी त्यांनी श्री कृष्ण हॉस्पिटलच्या संचालिका डॉ अनुजा देशमुख व डॉ प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसात केल्या. मेहनत आणि शिकण्याची तयारी यामुळे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं.

 

याच काळात त्यांनी पोलीस भरतीची तयारीही सुरू ठेवली. सातत्याने सराव करत असताना त्यांनी पहिल्यांदाच होमगार्ड भरतीसाठी अर्ज केला. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आणि सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे त्यांनी या भरतीत तिसरा क्रमांक मिळवला, जो त्यांच्या कष्टांचा मोठा सन्मान आहे.

 

१४ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. प्रशिक्षणानंतर त्यांना पहिली ड्युटी निवडणूक बंदोबस्तासाठी मिळाली. ही जबाबदारी त्यांनी आत्मविश्वासाने पार पाडली.

 

“ माँ से बेटी सवई ” या उपक्रमाअंतर्गत लिनस क्लब पाचोरा तर्फे त्यांची निवड करण्यात आली व विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी लिनेस क्लब पाचोरा च्या अध्यक्ष प्रा सौ जयश्रीताई वाघ यांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सन्मान सोहळ्यात तुळजाई शिक्षण संस्थेच्या सौ. सौदामिनीताई पाटील , श्रीकृष्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अनुजा देशमुख तसेच डॉ. प्रवीण देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.

 

कौटुंबिक परिस्थितीही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची होती. त्यांना एक मोठा भाऊ आणि दोन लहान भाऊ आहेत. त्या एकमेव बहीण आहेत. वडिलां शिवाय वाढताना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही.

मुस्कान पठाण यांची कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण आपलं ध्येय गाठू शकतो. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Don`t copy text!