खाकीतले ‘पोलीस काका-दिदी’ बनले विद्यार्थ्यांचे संरक्षण कवच

सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर, दि. १५ जून – जिल्हाभरात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा होत असताना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील ५०८ शाळांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधत सुरक्षिततेचे धडे दिले.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून शाळा प्रवेशोत्सव-२०२६ निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जिल्हा पोलीस दलातील ६० अधिकारी आणि ४०४ अंमलदारांनी विविध शाळांना भेटी दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी तसेच दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दिदी’च्या भूमिकेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, लाडगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत स्वागत केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या गुणांचे कौतुक केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. “पोलीस हे गुन्हेगारांसाठी कडक असले तरी चांगल्या आणि प्रामाणिक मुलांचे ते मित्र आहेत. कोणतीही अडचण आल्यास पोलिसांची मदत घ्यावी,” असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
तसेच डायल ११२ आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ हे क्रमांक खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेण्यात आले. अनोळखी व्यक्तींकडून चॉकलेट, बिस्किटे किंवा खेळणी स्वीकारू नयेत तसेच पालकांनी पाठविल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीसोबत जाऊ नये, अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
सायबर सुरक्षेबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडियाचे व्यसन तसेच इंटरनेटवरील अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे धोके याबाबत जागृती करण्यात आली.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर करून मैत्रीचे नाते निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात शिक्षण घेऊ शकेल यासाठी ग्रामीण पोलीस दल कटिबद्ध आहे. हा उपक्रम पुढेही नियमितपणे सुरू ठेवून पोलीस काका व पोलीस दिदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील.
दरम्यान, पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील हा आपुलकीचा संवाद पाहून पालक व शिक्षकांनीही पोलीस दलाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
























