Home महाराष्ट्र रस्त्यालगतची धोकादायक विहीर; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रस्त्यालगतची धोकादायक विहीर; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रस्त्यालगतची धोकादायक विहीर; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 

 

 

सोयगाव प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

सोयगाव-शेंदुर्णी-जळगाव मार्गालगत असलेली कठडाविना विहीर नागरिकांसाठी मोठा धोका ठरत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विहिरीभोवती कठाडे नसून जमिनीच्या लेवलला आहे कोणतीही संरक्षक व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

राज्यात यापूर्वी अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या असून, निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नुकत्याच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात भरधाव कार थेट विहीरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तसेच सिल्लोड तालुक्यात २३ जून २०११ रोजी परिसरात एसटी बस विहिरीत कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शेंदुर्णी हे मोठे बाजारपेठ केंद्र असल्याने या मार्गावर नेहमीच मोठी वाहतूक असते. सोयगाव येथून दररोज सुमारे ८०० ते १००० विद्यार्थी शिक्षणासाठी या मार्गाने प्रवास करतात. खानदेश व मराठवाडा जोडणारा हा महत्त्वाचा शॉर्टकट रस्ता असल्याने खासगी व पर्यटकांच्या वाहनांचीही मोठी वर्दळ असते.

ग्रामस्थांच्या मते, या ठिकाणी महिन्यातून एक-दोन किरकोळ अपघात घडत असतात. चार दिवसांपूर्वी दोन दुचाकी समोरासमोर धडकल्यानंतर एक मोटरसायकल थेट विहिरीच्या कडेला जाऊन थांबली होती; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. यापूर्वी बैलगाडीसह शेतमजूरही या विहिरीत पडल्याची घटना घडली होती.

विहीर तातडीने बुजवावी किंवा सुरक्षित कठडा उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र याबाबत संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात सोयगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

Don`t copy text!