Home महाराष्ट्र कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कारचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) –दत्तात्रय काटोले

कारचालकास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

९ एप्रिल २०२६ रोजी रात्री पद्मा हॉटेल ते शिवदत्त पेट्रोलपंप दरम्यान, देवळाई चौकाजवळ दोन मोटारसायकलींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळीने सुदामराव आबासाहेब शिंदे (वय ६७, रा. हातडी, ता. घनसांवगी, जि. जालना) यांना अडवून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी १० एप्रिल रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली.

१५ एप्रिल रोजी बीड बायपास परिसरात सापळा रचून रोहित रविंद्र काळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर सूरज रविंद्र काळे व ऋषिकेश गणेश उदावंत यांनाही अटक करण्यात आली.

आरोपींनी लुटलेली सोन्याची चैन विकून पैसे वाटून घेतल्याचे उघड झाले. त्यापैकी काही पैशांतून बुलेट मोटारसायकल खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचा तुकडा, गुन्ह्यात वापरलेली यामाहा एफझेड मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण सुमारे ४.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी चिकलठाणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Don`t copy text!