कानिफनाथाच्या अंघोळीला मढीत आल्या कासार पिंपळगाव च्या कावडी, कान्होबाच्या अंघोळीला निघाल्या जवखेडच्या कावडी

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ गडावर जाण्यासाठी कासार पिंपळगाव,मढी, सुसरे,माळी बाभुळगाव, तागडखेल, सावरगाव येथील प्रमुख मानाच्या कावडी पैठण हुन मढीकडे निघाल्या आहेत.तर जवखेडे खालसा येथील कावडी मीरी-तिसगाव रस्त्यावरील (तांबुळदेव) कान्होबा देवाकडे निघालेल्या आहेत.येथे पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे सहा वाजण्याच्या आत महा जलाभिषेक करण्यात येतो.आणि नंतर गलफ आणि फुलमाला अर्पण करण्यात येते.कासार पिंपळगाव येथील कावडी या पैठण येथुन निघालेल्या आहेत.शेवगाव, अमरापूर,हत्राळ, निवडुंगे मार्गे मढीतील फुलरबाग येथे दाखल होत आहेत.या कावडी शेवगाव येथे येताच गावातील गोल्डन मंडळाने मिष्टान्न भोजन दिले.अमरापूर येथे सर्जेराव गरड यांनी सकाळी नाश्ता दिला तर दुपारी कवडे परीवाराने प्रिती भोजन दिले.हत्राळ येथे विकास केदार आणि ग्रामस्थ यांच्या कडून भोजन देण्यात आले.नंतर हुशाआई येथे नवनाथ श्रीधर पवार,सुनिल राजळे यांच्या चहा नाश्त्या नंतर या कावडीचे फुलर बागाकडे प्रयाण करण्यात आले.फुलर बागातून दुपारी अडीच वाजता कानिफनाथ गडाकडे प्रस्थान होउन नंतर लक्ष्मी माता मंदिराजवळ निशान भेट होते.आणि वाजत गाजत कावडी कान्होबा गडावर जातात आणि कानिफनाथांना महा जलाभिषेक करण्यात येतो. कासार पिंपळगाव येथील स्व.सदु बाळा केळकर यांच्या नंतर त्यांचे वारसदार स्व.बाबु सदू केळकर आणि त्यांच्या नंतर त्यांचे नातू देविदास गिताराम केळकर हे या कावडीच्या निशाणाची धुरा सांभाळत आहेत.पैठणच्या नाथांचे हे मानाचे निशाण आहे.ते सांभाळण्याची केळकर घराणे हे आजपर्यंत परंपरा चालवत आहेत. या मानाच्या कावडीचा मान हा स्व.महीपती माळी हे चालवत होते.आता त्यांचे वंशज कडू दामू माळी, बाळासाहेब भिमा माळी,मच्छिंद्र भिमा माळी, भाऊसाहेब नाना माळी हे चालवत आहेत.कासार पिंपळगाव चे कानिफनाथ कावडी मंडळ हे सर्वांच्या सहकार्याने ही परंपरा पुढे चालवत आहेत.अमरापूर येथील कचरू गोविंद कवडे हे आजपर्यंत या कावडीला अन्नदान करीत आहेत.स्व.गोविंद देवबा कवडे यांच्या पासून म्हणजे शंभर वर्षांपूर्वी ही कावडीला अन्नदान करण्याची प्रथा सुरू झाली होती.विजय कचरू कवडे यांची चौथी पिढी ही परंपरा चालवत आहेत. त्याकाळी त्यांच्या आजीबाई धाराबाई गोविंद कवडे यांचे माहेर हे क्षेत्र मढी हे होते.जेव्हा त्यांना मुलबाळ होत नसल्याने त्यांनी कानिफनाथ देवाला मुलं व्हावेत म्हणून नवस केला होता. मुलबाळ झाले की कावडी जेवू घालीन. त्यांना देवबा आणि बापू हे दोघे भाऊ होते.त्यांचे वंशज सुर्यभान आसाराम कवडे आणि विजय कचरू कवडे हे चौथ्या पीढीची ही परंपरा चालवत आहेत.मुलबाळ झाल्या नंतर आज पर्यंत त्यांच्या कुटुंबात आता एकूण ११५ व्यक्ती आहेत. तेव्हा पासून आजपर्यंत नाथांच्या कावडी जेऊ घालण्याची परंपरा सुरू झाली आहे.ती आज तागायत रखमाबाई कचरू कवडे या सांभाळत आहेत.कासार पिंपळगाव येथील कावडी सोबत पैठण तालुक्यातील पारोडी येथिल राधाकिसन पांडुरंग खाडे हे ३९ वर्षापासुन कावड घेऊन येत आहेत.जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबुळदेव या देवासाठी पैठण येथुन कावडीने पाणी आणले जाते.तेथे पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे या कावडीच्या पाण्याने कान्होबाला जलाभिषेक करण्यात येतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना येथे प्रवेश दिला जातो.पाडव्याच्या दिवशी रात्री संदल मिरवणूक, दुसऱ्या दिवशी छबिना मिरवणूक,आणि तिसऱ्या दिवशी यात्रे निमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात येतो.आणि यात्रेचा समारोप होतो.























