नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात दिलीप वाघ करणार उमेदवारी; चर्चला उधाण

नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात दिलीप वाघ करणार उमेदवारी; चर्चला उधाण

पाचोरा (वार्ताहर) दि,१
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर झाल्याने तसेच ओबीसी आरक्षणावर राज्य शासनाने अध्यादेश काढून तात्पुरता मार्ग काढल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.निवडणूक आयोगाने देखील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे.प्रत्यक्ष निवडणूक या वर्षाअखेर होणार की आगामी फेब्रुवारी मध्ये होणार याबाबत विविध आखाडे बांधले जात असतांनाच विविध प्रकारच्या चर्चेच्या धुराळ्याना सुरुवात झाली आहे.

पाचोरा पालिकेत शिवसेनेची निर्विवाद सत्ता असल्याने यंदा भाजपा व राष्ट्रवादीने देखील पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असुन सूक्ष्म नियोजनास सुरुवात केली आहे.तर सत्ताधारि शिवसेनेने केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते जनतेचा कौल अजमावणार आहेत. अर्थात राजकीय गणिते जुळवण्यासाठी कशा प्रकारे युत्या, आघाड्या,वा छुपे समझोते होतात हे गुलदस्त्यात असले तरी निवडणुकांचा ज्वर मात्र वाढण्यास सूरुवात झाली आहे.
मात्र असे असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अधिक चर्चेत आला असून माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वाघ हे सुद्धा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.नगराध्यक्ष हे नगरसेवकांमधून असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना नगराध्यक्ष पदावर प्रबळ दावेदारी करत निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे शिवाय आगामी जिल्हापरिषद निवडणुकांचे आरक्षण स्थिती पाहून काही गटातून त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचा देखील आग्रह कार्यकर्त्यांमधून होत आहे.विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या पिछेहाटी नंतर कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी माजी आमदार वाघ हे देखील कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवतील असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करतांना दिसत आहेत.अर्थात राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मात्र एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवतात की निवडणुकांनंतर आघाडी करतात हे पालिकांची वार्ड रचना ,नगराध्यक्ष पदाचे आरक्षण तसेच जिल्हा परिषदेचे गट निहाय आरक्षण व जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच सर्व घडामोडींना वेग येणार असला तरी राजकीय धुरीणांनी मात्र आतापासून अंदाज आखाडे बांधण्यास सुरुवात केल्याने जनतेचे तूर्त राजकीय मनोरंजन होतांना दिसत आहे.