सोयगाव केंद्रीय शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा – ज्ञान जागरूकता व देशभक्तीचा सुंदर संगम

सोयगाव केंद्रीय शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा – ज्ञान जागरूकता व देशभक्तीचा सुंदर संगम

 

 

 

 

दत्तात्रय काटोले

सोयगाव : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे संविधान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी संविधान दिनाची सामूहिक शपथ घेऊन झाली. लोकशाही मूल्यांचे पालन, राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव आणि संविधानाबद्दल आदर बाळगण्याची प्रतिज्ञा करत विद्यार्थ्यांनी दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने जयघोष करत गावातून भव्य रॅली काढली. घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. गावकऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

 

या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील अद्वितीय योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. संविधानातील हक्क, कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्वांची सविस्तर माहिती शिक्षकांनी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

 

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक किरणकुमार पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्यांची जोपासना व देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरले.

 

कार्यक्रमास मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, श्रीमती सुरेखा चौधरी, श्री. रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी, अंकुश काळे, विकार शेख, बी. वाय. बागवान, देसले सर व पंकज रगडे सर यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

संविधान दिनानिमित्त अंकुश पगारे, सागर श्रीखंडे, सुमित गायकवाड, राहुल श्रीखंडे व मित्र परिवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व पेनांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.

 

दिवसभरातील सर्व उपक्रम उत्साहात, अनुशासनबद्धरीत्या पार पडले. संविधान दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, देशप्रेम व लोकशाहीविषयक मूल्य दृढ करणारा हा कार्यक्रम सर्वार्थाने संस्मरणीय ठरला.