केंदूरचे कलाशिक्षक संजय जोहरे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शांततेचे शिक्षण द्यावे – व्हिक्टोरिया मुत्तुम
सोयगाव येथील भूमीपुत्र संजय जोहरे यांना महाराष्ट्र राज्यतर्फे सन २०२५ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला.
दत्तात्रय काटोले
सोयगाव प्रतिनिधी केंदूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, केंदूर येथील उपक्रमशील कलाशिक्षक संजय जोहरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना, महाराष्ट्र राज्यतर्फे सन २०२५ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात जागतिक शिक्षक दिन निमित्त आयोजित दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. भारतातील आंतरराष्ट्रीय शांतता शिक्षण विभागाच्या संचालक व्हिक्टोरिया मुत्तुम यांच्या हस्ते जोहरे यांचा सत्कार झाला. कला, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्हिक्टोरिया मुत्तुम म्हणाल्या, “शिक्षकांनी विषयाबरोबरच विद्यार्थ्यांना शांततेचे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. शांततामय समाजनिर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी या दिशेने प्रयत्नशील राहावे,” असे त्या म्हणाल्या.
कलाशिक्षक संजय जोहरे यांना यापूर्वीही अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीकडून जिल्हास्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणे कडून राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट आर्ट टिचर पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.
या कार्यक्रमाला व्हिक्टोरिया मुत्तुम, राहुल मोरे, दीपक चौने, रावसाहेब मिरगणे, घनश्याम भोसले, वैभव गीते, संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव सत्यजित जानराव, संजय चौधरी, शिक्षक प्रशांत गांजरे व मनोज दोंड आदी मान्यवर उपस्थित होते.व सोयगाव येथील सर्व गावकरी व मित्र परिवार याच्या कडून शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.

























