निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या स्वराने जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेत मिळवले यश, विभागीय स्तरासाठी निवड..!

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या स्वराने जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेत मिळवले यश, विभागीय स्तरासाठी निवड..!

 

पाचोरा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा परिषद जळगाव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा अश्विन वाघ हिने आपल्या अचूक विचारशक्ती, संयम आणि रणनीतीच्या जोरावर १४ वर्षे वयोगटात चमकदार विजयाची नोंद करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्वराची निवड आता जळगाव येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली असून, ती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्वराच्या या यशामुळे शाळेत आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी स्वराचे मनःपूर्वक अभिनंदन करून विभागीय स्तरावरील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वराच्या या विजयामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री. प्रवीण मोरे आणि श्री. सोमनाथ माळी यांचे अथक परिश्रम, सततचे मार्गदर्शन व प्रेरणादायी प्रशिक्षण लाभले आहे.

बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चाल विचारपूर्वक, प्रत्येक पाऊल योजनेनुसार खेळत स्वराने आपल्या चातुर्य, आत्मविश्वास आणि शांततेच्या जोरावर विजयाची ‘चेकमेट’ साधली आहे. तिचा हा विजय केवळ वैयक्तिक नाही, तर निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्तापूर्ण क्रीडा संस्कारांचेही द्योतक आहे.