परतीच्या पावसाचा सोयगाव परिसरात कहर : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
सोयगाव, ता. २४ (प्रतिनिधी) —
परतीच्या पावसाने आज दुपारी बारा वाजल्यापासून सोयगाव परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
दुपारनंतर आलेल्या पावसासोबत वाऱ्याचाही जोर असल्याने सोयगाव शहरासह परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका, कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाजीपाला पिकांवर या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी नुकतेच कापणी केलेले मका व सोयाबीन शेतात साठवून ठेवले होते; परंतु अचानक आलेल्या पावसामुळे हे सर्व पीक भिजून नुकसानग्रस्त झाले आहे.
पाऊस सुरू होताच शेतकरी वर्ग पिकांच्या गंजी झाकण्यासाठी धावपळ करताना दिसला. मात्र वारा व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गंजी उघड्याच राहिल्याने धान्य ओले झाले आहे. परिणामी मका व सोयाबीनची गुणवत्ता घसरून आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग लागवडीसाठी रोटावेटर मारण्याची तयारी केली होती. परंतु पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पुढील दोन ते चार दिवस तरी मशागतीचे काम होऊ शकणार नाही. यामुळे पेरणी उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातही पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले असून काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच कमकुवत झालेले आर्थिक समीकरण अधिकच बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
























