एमसीए संलग्न नॅशनल क्रिकेट क्लबकडून मुंबईतील ‘ग्राऊंड्समन’चा सन्मान!
– एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची प्रमुख उपस्थिती
– नॅशनल क्रिकेट क्लबचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनी केला सन्मान सोहळ्याचे आयोजन
मुंबई, प्रतिनिधी
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) संलग्न नॅशनल क्रिकेट क्लब (NCC) ने मुंबईतील क्रिकेटच्या मैदानांना आकार देणाऱ्या ४० हून अधिक ग्राऊंड्समनचा नुकताच गौरव केला. मुंबईतील क्रिकेट प्रतिभेच्या या ऐतिहासिक भूमीचे खरे आधारस्तंभ असलेले ग्राऊंड्समन हेच मुंबई क्रिकेटचे ‘अनामिक नायक’ आहेत, अशी NCC ची धारणा आहे.
मुंबईत आयोजित या विशेष सोहळ्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. तसेच, आमदार मिलिंद नार्वेकर, एमसीएचे ऍपेक्स सदस्य व भारताचे माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे आणि अनुभवी पिच क्यूरेटर नदीम मेमन हे ही विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
NCC चे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, MCA शी संलग्न असलेल्या NCC ने अनेक राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडू घडवले आहेत.
एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ग्राऊंड्समनच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले की, “मुंबईच्या मातीतून तयार होणाऱ्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसाठी उत्कृष्ट खेळपट्टी पुरवणारे हेच आपले ग्राऊंड्समन आहेत. त्यांच्या निःस्वार्थ श्रमामुळेच मुंबई क्रिकेटचा पाया अधिक मजबूत आहे. त्यांचे हे अमूल्य योगदान आहे आणि MCA त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहील. ग्राऊंड्समन फक्त खेळपट्टी बनवत नाहीत, तर उद्याच्या क्रिकेटपटूंच्या स्वप्नांनाही आकार देतात. एनसीसीचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनी ग्राऊंड्समनचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.”
राजदीप गुप्ता यांनी ग्राऊंड्समनच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “मुंबई क्रिकेटची पंढरी असले, तर ग्राउंड्समन त्याचे पुजारी आहेत. ग्राऊंड्समनसारख्या कृतज्ञता न मिळणाऱ्या कामासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणे सोपे नाही. पण त्यांच्यामुळेच खेळाडू षटकार मारू शकतात आणि बाउन्सर टाकू शकतात. प्रशिक्षक खेळाडूंचे मूलभूत कौशल्ये मजबूत करतात, तर ग्राऊंड्समन खेळाच्या मैदानाला मजबुती देतात. मुंबईच्या क्रिकेटला आकार देण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे.”
गुप्तांचा विश्वास आहे की, ग्राऊंड्समनच खेळाडूंना स्थानिक स्तरावरून जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्यासाठी मदत करतात. “मुंबईच्या मैदानांवर तयार होणाऱ्या खेळपट्ट्यांची प्रतिकृती बनवणे खूप कठीण आहे. हे सर्व केवळ या ग्राऊंड्समनच्या अथक मेहनतीमुळे आणि विशेष कौशल्यामुळे शक्य होते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यशस्वी उद्योजक असलेले राजदीप गुप्ता हे रूट मोबाईल लिमिटेडचे मालक आहेत. त्यांच्याकडे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) मध्ये चेन्नई सिंगम्स आणि MCA-आयोजित मुंबई टी२० लीगमध्ये नॉर्थ मुंबई पँथर्स अशा दोन क्रिकेट फ्रँचायझीची मालकी आहे. ते कॉर्पोरेट क्रिकेट लीग्सचेही आयोजन करतात, ज्यामुळे नोकरीची सुरक्षितता असतानाही उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळते. विशेष म्हणजे, रूट मोबाईलमध्ये २०० हून अधिक क्रिकेटपटू विविध पदांवर कार्यरत आहेत.
मुंबईच्या मैदानांवर ४० वर्षांहून अधिक काळ खेळपट्ट्या तयार करणारे ज्येष्ठ ग्राऊंड्समन रामचंद्र शॉ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जेव्हा खेळाडू मोठी धावसंख्या करतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतात, तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. “माझा जन्म याच मैदानांवर झाला आणि एका अर्थाने, या मैदानांनीच, विशेषत: NCC ने मला वाढवले. आम्ही खेळपट्ट्या बनवतो, पण खरं तर, याच खेळपट्ट्या आम्हाला आणि आमच्या आयुष्याला आकार देतात,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

























