श्री लंकेच्या प्रचारासाठी शरद पवारांची नगर जिल्ह्यात पाच उड्डाणे

श्री लंकेच्या प्रचारासाठी शरद पवारांची नगर जिल्ह्यात पाच उड्डाणे

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) “महाराष्ट्राच्या कंठातील हार, शरदचंद्र गोविंद पवार” हे गीत सुप्रिमो शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारा डिसेंबरला प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी गायन करुन हे गीत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध करण्यात आले होते.या गाण्या प्रमाणेच पवार साहेब महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री लंकेच्या प्रचारासाठी शरद पवार यांची नगर जिल्ह्यात पाच उड्डाणे आयोजित करण्यात आली आहेत.महायुतीचे उमेदवार सुजयदादा विखेपाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच विखे लंके यांनी प्रचाराला सुरुवात करून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडवला आहे.लंकेच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या की त्या ठिकाणी लगेचच विखे यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून सभा घेण्याचा विखेपाटील परिवाराने सपाटा लावला आहे. विखे लंकेच्या निवडनुक प्रचारात अनेक गमतीजमती घडत आहेत.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.गेल्या दहा वर्षांत विखेंनी काय केले असे प्रश्न विचारले जात असतानाच लंकेनी सुप्यातील अनेक कंपन्या का पळून लावल्या असेही आरोप करण्यात येत आहेत.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रचाराच्या जाहीर सभेमुळे विखे लंके यांची चांगलीच दमछाक झाली आहे.कोणत्याही परीस्थितीत अहमदनगर दक्षिणची जागा ही तुतारी वाजवून जिंकायचीच हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच चंग बांधला आहे.शरदचंद्र पवार यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांना चांगलेच फटकारले असुन उघडपणे प्रचार करण्यासाठी निवडणुकीत सर्व अस्त्रांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.दस्तुर खुद्द शरदपवार यांनी स्वतः अहमदनगर जिल्ह्यात पाच जाहीरसभा घेण्याचा फतवा काढला आहे. २५ एप्रिल रोजी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या शेवगाव येथे पहीली जाहीर सभा होणार आहे.दुसरी सभा २८ एप्रिल रोजी श्रीगोंदा येथे होणार आहे.तिसरी सभा दिनांक २मे रोजी राहुरी येथे होणार आहे.चौथी सभा ९ मे रोजी पारनेर येथे होणार आहे.आणि शेवटची पाचवी सांगता सभा ११मे रोजी अहमदनगर शहरात होणार आहे.शरदचंद्र पवार यांच्या पाच सभेमुळे महाविकास आघाडीच्या पंखात चांगलेच बळ निर्माण होणार आहे.ही लढाई विखे पाटील विरुद्ध लंके पाटील अशी नसुन विखेपाटील विरूद्ध शरदचंद्र पवार अशीच होणार आहे.सन १९९१च्या निवडणुकीत स्व.बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख पाटील ही लढाई संपूर्ण देशभर चांगलीच गाजली होती.त्यात शरदचंद्र पवार यांच्या सहकार्याने विखे पाटील यांचा पराभव झाला होता.आणि यशवंतराव गडाख हे विजयी झाले होते.नंतर विखे पाटील यांनी न्यायालयात ही लढाई जिंकली होती आणि गडाख पाटील यांची खासदारकी रद्द करून शरदचंद्र पवार यांना थेट न्यायालयात खेचून जोरदार शह दिला होता.त्या निवडणुकी पासून विखे पाटील विरुद्ध शरदचंद्र पवार हे राजकीय वैर अखंड महाराष्ट्राने प्रत्यक्ष अनुभवले आहे.म्हणून शरदचंद्रजी पवार यांनी आजूनही अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत विषेश लक्ष केंद्रित केले आहे. पुन्हा सन १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्यासाठी शरदचंद्र पवार यांनी तुतारी वाजवत या वयातही चांगलीच कंबर कसली आहे.खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी ही निवडणूक हलक्या हाताने न घेता डोळ्यात तेल घालून लंकेच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देत कडक पहारा ठेवला आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडनुकीतील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच निवडणुकीत खरा रंग भरला जाणार आहे.निवडनुकीची खरी लढाई सुरू होण्याआधीच निलेश लंके यांच्या पायावर टाके टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.लंकेपाटील विरोधात विखे पाटील या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अहमदनगर दक्षिण चे सुज्ञ मतदार नेमकं काय करायचं हे मात्र उघड बोलत नाहीत.