यू-ट्युबच्या पत्रकाराला धक्काबुक्की पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत राज्यात पहिला गुन्हा दाखल ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश

यू-ट्युबच्या पत्रकाराला धक्काबुक्की
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत राज्यात पहिला गुन्हा दाखल
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश

सोलापूर (प्रतिनिधी) : माझ्याविरुद्ध बातमी देतोस का, असा राग मनात धरून, पत्रकारास धमकी देत धक्काबुक्की करून वार्तांकनास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रयत्नाने यू-ट्युब चॅनेलच्या पत्रकारावर हल्लाप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत बार्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात एखाद्या यू-ट्युब चॅनेल पत्रकारावर हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्यामुळे हा राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण माने ( प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग रा. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत `हिंदवी समाचार’चे संपादक धीरज शेळके यांनी बातमी प्रसारित केली होती. पत्रकार शेळके यांनी स्वयम शिक्षण प्रयोगचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांची झालेल्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया मागितली असता, वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले. तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बार्शी येथील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे, बार्शी तालुका अध्यक्ष संदीप मठपती, हर्षद लोहार, प्रदीप माळी, शाम थोरात, विजय शिंगाडे, अस्लम काझी, मयूर थोरात, समाधान चव्हाण यांनी पत्रकार धीरज शेळके यांना धीर दिला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याने प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांच्याविरोधात भादंवि कलम 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार हल्लाविरोधी फोरमचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन यांनी सांगितले की, 2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदाप्रकरणी अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बारामती येथील अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशन काळात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने साखळी उपोषण केले होते. या प्रकरणी राज्य शासनाला अनेक वेळा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी भेटले होते. परिणामी शासन स्तरावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याची वेळोवेळी दखल घेण्यात आली. बार्शीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल महाजन यांनी समाधान व्यक्त केले. राज्यभर हा कायदा सक्षम होण्यासाठी आम्ही टीम उभी केली आहे, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार धीरज शेळके यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पत्राच्या माध्यमातून आभार मानले आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्यध्यक्ष अनिल म्हस्के यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.