ग्रामीण भागातील हर्षलची गगन भरारी चार महिन्यात तीन क्षेत्रातील अधिकारी पदी निवड
गोंदेगाव येथील रहिवासी सौ विजया व श्री अरुण पांडू पाटील (मुख्याध्यापक जि प शाळा) यांचा मुलगा हर्षल पाटील याने आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्या यशाने इतिहास घडविला आहे. अवघ्या चार महिन्यात तीन क्षेत्रात अधिकारी पदी स्थान मिळवत हर्षलने यश संपादन केले आहे. बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली या शासकीय स्वायत्त कॉलेज मध्ये बीटेक आयटी साठी प्रवेश घेतला. यशस्वीरित्या इंजिनिअरिंग पूर्ण करून कॅम्पस सिलेक्शन मध्ये लाखोचे पॅकेज मिळाले. मात्र ते नाकारत स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचा निश्चय घेतला. आपल्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) मार्फत सुप्रीटेंडंन्ट या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून सुप्रिटेंडन्ट या ग्रुप बी पदावर सीबीएसई क्षेत्रीय कार्यालय चेन्नई येथे ५ जानेवारी २०२६ रोजी आपल्या पहिल्या सेवेत रुजू झाला. यानंतर दोन महिन्यात ११ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर निवडीसाठी आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून १ एप्रिल रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वरखेडी ता. पाचोरा शाखेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून दुसऱ्या सेवेत रुजू झाला. अवघ्या काही दिवसांची सेवा बँकेत देत असतानाच एस एस सी सी एल जी २०२५ चा अंतिम निकाल ८ एप्रिल २०२६ ला जाहीर झाला. त्यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) मध्ये ऑफिस सुपरिटेन्डट या ग्रुप बी पदावर निवड झाली आहे. आपल्या या यशामागे शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक व आई-वडिलांची खंबीर साथ असल्याचे सांगत पुढील सेवा इन्कम टॅक्स क्षेत्रात देण्याचा मानस हर्षलने व्यक्त केला आहे. आपल्या जिद्द व चिकटेच्या जोरावर त्याने काही महिन्यातच एक नव्हे तर तीन अधिकारी पदांवर आपले नाव निश्चित केले आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात शासकीय सेवा नाहीत अथवा आपल्याला संधी नाही असे म्हणणाऱ्या तरुणांसाठी हर्षलने एक आदर्श प्रस्थापित केला आहे. इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये लाखोचे मोठे पॅकेज नाकारून हर्षलने शासकीय सेवेत सेवा करण्याचे आपले ध्येय गाठले आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत आहे. हर्षल हा गोराडखेडा तालुका पाचोरा येथील जिल्हा बँकेचे निवृत्त शाखा अधिकारी आर ए पाटील यांचा नातू आहे. शिवराणा व्याख्याते संतोष पाटील सर तसेच गोराडखेडा ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार मनोज पाटील सर यांचा भाचा आहे. हर्षल ने शासकीय सेवेत सेवा देऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुण वर्गासाठी प्रेरणा व आदर्श निर्माण केला आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाचोरा येथील माजी नगरसेवक तथा जीवनशक्ती मायक्रो फायनान्स चे अध्यक्ष विकास पाटील सर, संचालक जगदीश पाटील सर, हेमंत सोनवणे सर, मनोज पाटील सर व संपूर्ण मायक्रो फायनान्स टीम तर्फे हर्षलचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.























