श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी सहशालेय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंके मॅडम यांच्या उपस्थितीत संजय ओंकार वाघ (चेअरमन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था), जगदीश सोनार (स्कूल कमिटी चेअरमन), एस. डी. पाटील (संस्थेचे समन्वयक), सिताराम पाटील (माजी मुख्याध्यापक), सतीश चौधरी, जेष्ठ शिक्षिका लक्ष्माबाई सोनवणे मॅडम, सारिका पाटील मॅडम, पालक प्रतिनिधी संजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
डिसेंबर महिन्यात आयोजित मैदानी क्रीडा स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंके मॅडम यांनी केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. एस. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच पालकांनी मुलांना पुरेसा वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय ओंकार वाघ यांनी बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. शाळेची प्रगती, भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता पाहून मुख्याध्यापिका व शिक्षकवर्गाचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा पाटील मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. स्वप्नील माने सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.






















