पाचोऱ्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत, जळगाव’ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली समृद्धजन फाऊंडेशन युथ क्लब द्वारा तावरे कन्या कनिष्ठ महाविद्यालय व जागृती विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली.
ह्यांतर्गत १५ ते २९ वयोगटातील युवक व युवतींसाठी कबड्डी, खो-खो, १०० मी धावणे, गोळाफेक ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी युवा स्वयंसेवक श्री. कमलेश सोनवणे यांनी प्रास्ताविकातून ‘पाचोरा तालुक्यातील युवक-युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी’ मायभारतद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सांगत आलेल्या सर्व स्पर्धकांचे स्वागत केले. जिल्हा युवा अधिकारी श्री. अभिषेक चवरे यांनी सर्व उपस्थितांना मेरा युवा भारत व्यासपीठाची ओळख करून देत यापुढेही असे उपक्रम राबविण्यात येतील, त्यात हिरीरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शनासाठी उपस्थित पाचोरा नगरपालिकेचे गटनेते श्री. सुमित दादा पाटील, श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जयंतराव पाटील, तावरे कन्या महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा. प्रताप तावरे, केंद्रप्रमुख श्री. अभिजीत खैरनार, नगरसेवक श्री. सुमित सावंत यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
ह्या स्पर्धांमध्ये संपूर्ण तालुक्यातून एकूण 120 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. सर्व स्पर्धांतील पहिल्या तीन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून क्रीडाशिक्षक श्री. आर. आर. आव्हाड व श्री. शुभम चौधरी यांनी कार्य केले. तर तावरे कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एफ. पाटील, पर्यवेक्षक श्री. पी. आर. पाटील, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. जी. सावंत व ए. पी. अकॅडमीचे संचालक श्री. राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. चेतना हिरे हिने केले.






















