दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण व पटनोंदणी मोहीम सुरु पाचोरा शिक्षण विभागाची कार्यवाही
पाचोरा – येथील पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा मार्फत पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण व पटनोंदणी करण्याची कार्यवाही नुकतीच सुरु करण्यात आली. लासगाव येथे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचा शाळा प्रवेश निश्चित केला. यावेळी विशेष शिक्षक घनशाम चौधरी, जयदीप पाटील, सुवर्णा पाटील यांची उपस्थिती होती. गट शिक्षणाधिकारी विजय पवार व शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व केंद्र प्रमुख यांच्या संनियंत्रणात चौदा विशेष शिक्षक पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणार आहेत. सदर मोहीम दहा जुलै पर्यंत राहणार असून नवीन शैक्षणिक वर्षात विशेष बालकांना दाखल करणे, त्यांना समग्र शिक्षा मार्फत आवश्यक साहित्य मिळवून देणे, पालकांचे समुपदेशन करणे, विशेष गरजा असलेल्या बालकांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी सदर सर्वेक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे पाचोरा शिक्षण विभागाने कळवले आहे.






















