Home महाराष्ट्र अधिक मासात नात्यांचा गोडवा; आर्थिक अडचणींवर मात करत जावयाच्या मानपानाची परंपरा जपण्याची...

अधिक मासात नात्यांचा गोडवा; आर्थिक अडचणींवर मात करत जावयाच्या मानपानाची परंपरा जपण्याची धडपड

अधिक मासात नात्यांचा गोडवा; आर्थिक अडचणींवर मात करत जावयाच्या मानपानाची परंपरा जपण्याची धडपड

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले अधिक मास म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचा काळ नाही, तर नातेसंबंधांतील जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ करणारा महिना मानला जातो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पुरुषोत्तम मासात लेक-जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात जपली जात आहे.

यंदा मात्र वाढत्या महागाईने आणि गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरांनी अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. जावयासाठी सोन्याची अंगठी, कपडे आणि वाण देण्याची इच्छा असूनही अनेक सासरवाडीची मंडळी जुळवाजुळव करताना दिसत आहेत. तरीही, “परंपरा मोडायची नाही” या भावनेतून प्रेमाने आणि आपल्या ऐपतीनुसार जावयाचा मान राखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ग्रामीण भागात धोंडे जेवणासाठी विशेष तयारी सुरू असून, पुरणपोळी, आमरस, अनारसे आणि पारंपरिक पदार्थांचा सुगंध घराघरांत दरवळत आहे. सासू-सासरे आपल्या जावयाला “विष्णूचे रूप” मानून त्याचे औक्षण करताना भावनिक वातावरण निर्माण होत आहे. नवविवाहित जावयांसाठी तर हा पहिलाच अधिक मास असल्याने त्यांच्या स्वागतासाठी विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

एका शेतकरी कुटुंबातील वडिलांनी सांगितले, “सोने घेणे यंदा कठीण झाले आहे. पिकाला भाव नाही, खतांचे दर वाढलेत; पण जावयाचा मान कमी पडू देणार नाही. अंगठी छोटी असेल, पण प्रेम मोठं असेल.”

अधिक मासातील ३३ वस्तूंच्या वाणाची परंपराही अनेक ठिकाणी जपली जात आहे. तांब्याचे ताट, पितळेची आरती, दिवे आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. व्यापाऱ्यांनाही या काळात चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.

धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक जिव्हाळा आणि परिस्थितीशी झुंज देत परंपरा जपण्याची धडपड — यामुळे यंदाचा अधिक मास अनेकांसाठी भावनिक ठरत आहे. महागाई कितीही वाढली तरी नात्यांतील ऊब आणि मानपानाची परंपरा आजही कायम असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

Don`t copy text!